नवी दिल्ली : आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्याचे आश्चर्य वाटत असल्याचे सांगत भारताचा वरिष्ठ फलंदाज शिखर धवनने भविष्यात राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू मायदेशात होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेसाठी युवा संघाची घोषणा केली आहे.
३७ वर्षांचा डावखुरा फलंदाज धवन आशियाई स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. धवन म्हणाला की, आशियाई स्पर्धेसाठी संघात माझे नाव नसल्यामुळे मला खूप आश्चर्य वाटले. मात्र, निवडकर्त्यांनी वेगळा विचार करून संघ निवडला असेल हे लक्षात आल्यावर मी हा निर्णय स्वीकारला.
भविष्याची चिंता नाहीदहा वर्षांपासून भारताच्या आघाडीच्या वनडे फलंदाजांमध्ये समावेश असलेला धवन म्हणाला की, भविष्यात काय होईल मला माहिती नाही. मात्र, संधी मिळाली तर मी त्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे मी तंदुरुस्तीवर भर देत आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी नेहमीच असते. या संधीला टक्केवारीत मोजता येणार नाही. मी सध्या ट्रेनिंगची मजा घेत आहे. मला क्रिकेटमधून आनंद मिळतो. त्यामुळे निवड समितीने घेतलेल्या निर्णयाचा मी सन्मान करतो. धवन अद्याप केंद्रीय करार असलेला क्रिकेटपटू आहे.