ओव्हल : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिले दोन दिवस भारतासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरूवात केली. ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी पहिल्या डावात ४६९ पर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांना आलेले अपयश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेली अप्रतिम खेळी पाहता पहिल्या डावात भारताला मोठा धक्का बसला.
ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात १२१. ३ षटकांत ४६९ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय रवींद्र जडेजाने एक बळी घेतला. ४६९ धावांचा डोंगर उभारल्याने ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत होता. अशातच कांगारूच्या गोलंदाजांनी देखील कमाल करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरूंग लावत सामना आपल्या बाजूने झुकवला. पण, मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आणि शार्दुल ठाकूरने भारताची लाज राखल्याचे दिसते. रहाणेने ८९ तर शार्दुलने ५१ धावांची अप्रतिम खेळी केली.
रहाणे-ठाकूरचा मायबोलीतून संवाद
या जोडीच्या सावध खेळीमुळे फॉलोऑनचा धोका टळला अन् कुठेतरी भारतीय चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला. रहाणे आणि शार्दुल दोघेही मराठमोळे खेळाडू आहेत. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर खेळताना ते मराठीतून संवाद करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी मैदानात अजिंक्य रहाणे शार्दुल ठाकुरचे कौतुक करतो याशिवाय त्याला घाई न करण्याचा सल्ला देखील देतो. प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षणात करत असलेले बदल देखील रहाणे त्याच्या निदर्शनास आणून देतो.
दरम्यान, तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३६.३ षटकांत ४ बाद १२३ धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन (४१) आणि कॅमेरून ग्रीन (७) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाला (२) तर मोहम्मद सिराद आणि उमेश यादव यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.