VIDEO: पाकिस्तानात पोहोचल्यावर आसिफ अलीने चाहत्यावरही उगारला हात, व्हिडीओ व्हायरल 

पाकिस्तानी संघाचे 10 वर्षांनंतर आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 07:32 PM2022-09-13T19:32:18+5:302022-09-13T19:33:29+5:30

whatsapp join usJoin us
A video of Asif Ali getting angry with a fan In Pakistan airport is going viral | VIDEO: पाकिस्तानात पोहोचल्यावर आसिफ अलीने चाहत्यावरही उगारला हात, व्हिडीओ व्हायरल 

VIDEO: पाकिस्तानात पोहोचल्यावर आसिफ अलीने चाहत्यावरही उगारला हात, व्हिडीओ व्हायरल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचे 10 वर्षांनंतर आशिया चषक (Asia Cup 2022) जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी विजय मिळवून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. पाकिस्तानी संघाच्या पराभवामुळे चाहतेही निराश आणि संतप्त झाले असून ते आपल्याच संघाला खडे बोल सुनावत आहेत. आशिया चषकातील अखेरचा सामना खेळल्यानंतर पाकिस्तानी संघ मायदेशी परतला तेव्हा विमानतळावरही अशीच परिस्थिती होती. खेळाडूंना चाहत्यांकडून कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागू नये म्हणून कडेकोट बंदोबस्तात त्यांना विमानतळाबाहेर काढण्यात आले. बाबर आझम आणि नसीम शाह यांना विमानतळाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या लोकांनी गाड्यांपर्यंत सोडले. 

दरम्यान, विमानतळावरून बाहेर पडताना आसिफ अलीने आशिया चषकातील लाईव्ह सामन्यात केलेल्या चुकीची पुनरावृत्ती केली. सेल्फीची विनंती करत असलेल्या चाहत्यावर त्याने हात उगारला, त्याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. आसिफ विमानतळावरून बाहेर पडत असताना चाहत्यांमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. यादरम्यान एका चाहत्याने त्याला सेल्फी घेण्यासाठी स्पर्श केला असता तो चांगलाच संतापला. यामुळे पाकिस्तानी खेळाडू चिडला आणि त्याने लगेचच त्या चाहत्याकडे रागाने पाहत हात झटकून बाजूला केला आणि वेगाने पुढे गेला. व्हिडीओमध्ये देखील हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. असिफच्या या कृत्यावरून त्याच्यावर टीका होत आहे. 

आशिया चषकातील चुकीची केली पुनरावृत्ती
आशिया चषकाच्या स्पर्धेतील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सामन्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. याच सामन्यात पाकिस्तानच्या आसिफ अलीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर बॅट उगारून स्पर्धेला गालबोट लावले. यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंवर आयसीसीकडून कारवाई देखील करण्यात आली होती. अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमदने आसिफ अलीला बाद करताच जल्लोष केला आणि त्यावरूनच दोघांमध्ये जुंपली होती. 

श्रीलंकेने सहाव्यांदा जिंकला आशिया कप 
अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरूवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावा करू शकला.
 

Web Title: A video of Asif Ali getting angry with a fan In Pakistan airport is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.