नवी दिल्ली : आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे. खरं तर भारतीय खेळाडूंचे चाहते जगभर आहेत. भारतीय खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी नेहमी चाहते आतुर असतात. असाच काहीसा प्रकार गुवाहाटीमध्ये घडला. रोहित शर्माला पाहून एक छोटा चाहता भावुक झाला आणि ढसाढसा रडू लागला. यानंतर रोहितने स्वतः जाऊन त्याच्या या छोट्या चाहत्याच्या आनंदात सहभाग घेतला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे उर्वरित खेळाडू बारसापारा क्रिकेट मैदानावर सराव करत होते. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी अनेक चाहते सराव सत्राला लागून असलेल्या स्टँडजवळ उभे होते. भारतीय क्रिकेट संघाच्या सरावानंतर एक एक करून सर्व खेळाडू टीम बसकडे जाऊ लागले. रोहित स्टँडजवळून जाताच गर्दीत उभा असलेला त्याचा छोटा चाहता त्याला पाहून जोरजोरात रडू लागला. आपल्या छोट्या चाहत्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून रोहित स्वतः त्याच्याजवळ गेला आणि रडण्याचे कारण विचारले. तेव्हा मुलाने सांगितले की, तो त्याचा आवडता क्रिकेटर आहे.
रोहितने चाहत्याला सावरलेयावर रोहित म्हणाला मग तू का रडतोय? एक लहान मूल आहेस? असे म्हणत त्याने त्याचे गाल ओढायला सुरुवात केली. आपल्या स्टार क्रिकेटरकडून मिळालेल्या प्रेमाने या चिमुकल्या चाहत्याच्या चेहऱ्यावर हशा पसरला. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या इतर चाहत्यांनी रोहितकडे सेल्फीची मागणी करण्यास सुरुवात केली. रोहितने कोणालाही निराश केले नाही आणि सेल्फीसाठी पोज दिल्यानंतर तो टीम बसमध्ये चढला.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
भारत विरूद्ध श्रीलंका वन डे मालिका
- 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
- 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
- 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"