नवी दिल्ली : सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा थरार रंगला आहे. या मालिकेत जगभरातील माजी दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मधून पुन्हा एकदा क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर (Sachin Tendulkar in Road Safety World Series) मैदानात परतला आहे. सचिन तेंडुलकरच्या जुन्या अवताराची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली आहे. सचिन इंडिया लिजेंड्स संघाचा हिस्सा असून त्यांनी पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजेंड्सविरूद्ध विजय मिळवला होता. कर्णधार तेंडुलकरने पहिल्याच सामन्यात 16 धावांची छोटी खेळी करून चाहत्यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली होती.
दरम्यान, शनिवारी झालेल्या दक्षिण आफ्रिका लीजेंड्सविरूद्धच्या सामन्यात स्टुअर्ट बिन्नी आणि सुरेश रैना यांनी शानदार खेळी केली आणि सचिनच्या इंडिया लीजेंड्स संघाने विजयी सलामी दिली. सध्या युवराज सिंग, इरफान पठाण, सुरैश रैना आणि सचिन तेंडुलकर यांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रैना आणि इरफान पठाण गाणं गात असून युवराज सिंग याच्यावर भन्नाट डान्स करत आहे. खुद्द युवराज सिंगने याचा व्हिडीओ ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे जो चर्चेचा विषय बनला आहे.
इंडिया लीजेंड्सचा संघ सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यु मिथुन, राजेश पवार आणि राहुल शर्मा.
...म्हणून खेळली जाते ही मालिकासचिन रोड सेफ्टीच्या मुद्द्यावरून जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतो. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज इंडिया इव्हेंटचा उद्देश हा रस्ता आणि वाहतूक सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणे आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स या संघांचा सहभाग आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लीजेंड्सचा पराभव केला.