नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. या मालिकेतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर झाला. भारतीय संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. पण झुलनच्या फेअरवेल मॅचपेक्षाही हा सामना अन्य काही कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. खरं तर या सामन्यात भारतीय संघाची फिरकीपटू दीप्ती शर्माने इंग्लंडची खेळाडू चार्ली डीन क्रीजमधून बाहेर पडल्यामुळे तिला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. यावरूनच आता मोठा वाद चिघळला आहे.
दीप्ती शर्माने आयसीसीच्या नियमांमध्ये राहूनच मंकडिंग पद्धतीने धावबाद केले होते. मात्र या रनआउटमुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी याला खेळ भावनेविरुद्ध म्हटले आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काहीजण दीप्ती शर्माच्या समर्थनात आहे, तर काही लोक तिच्या कृतीला विरोध करत आहे. आता या वादात इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने देखील उडी घेतली आहे. यावरूनच समालोचक हर्षा भोगले आणि स्टोक्स यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
दीप्ती शर्माविरुद्ध सोशल मीडियावर होत असलेल्या असलेल्या टीकेवर बोलताना हर्षा भोगले यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी एकामागून एक अनेक ट्विट केली आणि दीप्तीवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले की, "ब्रिटनने जगाच्या मोठ्या भागावर दीर्घकाळ राज्य केले आहे. त्यावेळी फार थोडे प्रश्न निर्माण झाले होते. त्याचा परिणाम असा झाला की आज इंग्लंड जे चुकीचे मानते, ते बाकीच्या संघांनीही त्याच पद्धतीने स्वीकारावे व समजून घ्यावे, अशी मानसिकता तयार झाली आहे. हे जसे ऑस्ट्रेलियन लोक त्यांच्या सीमा ओलांडू नका असा उपदेश करतात. त्यांनी स्वत: त्यांच्या संस्कृतीनुसार हे तत्त्व केले आहे. ते इतरांसाठीही चांगले असेलच असे नाही. संपूर्ण जग इंग्लंडच्या विचारानुसार चालत नाही. समाजात कायद्याचे राज्य आहे, त्यामुळे क्रिकेटमध्येही ते लागू होते. मात्र लोक दीप्तीवर विनाकारण टीका करत असल्याने मी नाराज आहे. क्रिकेटच्या नियमात राहून तिने हे काम केले आहे. अशा स्थितीत तिच्यावर होणारी टीका थांबली पाहिजे."
हर्षा भोगलेंच्या ट्विटवर स्टोक्सने प्रत्युत्तर दिलेहर्षा भोगले यांनी केलेल्या ट्विटमुळे बेन स्टोक्स दुखावला. त्याने प्रत्युत्तर देताना म्हटले, "हर्षा मी तुम्हाला सांगेन की २०१९ विश्वचषक संपून २ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. पण आजही भारतीय चाहते मला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवतात. तर याचा तुम्हाला त्रास होतो का?."
हर्षा भोगलेंनी इंग्लंडच्या संस्कृतीवर विचारले होते प्रश्न हर्षा भोगले यांनी या सर्वाला इंग्लंडच्या संस्कृतीला जबाबदार ठरवले होते. दीप्तीच्या बचावात त्यांनी ट्विटमध्ये लिहले की, "मुद्दा संस्कृतीचा आहे, मी असे यासाठी म्हणत आहे की अशा गोष्टी विचाराने वाढलेल्या आहेत. त्यांना समजत नाही काय चूक आहे? ते जे चुकीचे मानतात, तेच इतरांनीही समजावे असे त्यांना वाटते. इथूनच त्रास सुरू होतो."
स्टोक्सचा राग अनावर या ट्विटला प्रत्युत्तर देताना बेन स्टोक्सने म्हटले, "तुम्हाला वाटते की ही संस्कृतीची बाब आहे? अजिबात नाही…मला २०१९ विश्वचषकात ओवर थ्रो वरून जगभरातील लोकांकडून अनेक प्रकारचे मेसेज येत राहतात. त्याचप्रमाणे लोक दीप्ती शर्माच्या मंकडिंगच्या विरोधात ट्विट करत आहेत. यामध्ये इंग्लंड हा एकमेव क्रिकेट खेळणारा देश नाही. बाकीचे देशही या नियमाबाबत आपले म्हणणे मांडत आहेत."
काय आहे संपूर्ण प्रकरण? भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १५३ धावा करू शकला. इंग्लिंश संघाला विजयासाठी ४० चेंडूत १७ धावांची आवश्यकता होती आणि इंग्लंडचे ९ बळी गेले होते. तेवढ्यात सामन्याला एक वेगळे वळण आले, दीप्ती शर्मा गोलंदाजीसाठी आली आणि तिने मंकडिंग पद्धतीने चार्ली डीनला बाद केले. यावरून आजतागायत वाद सुरू आहे.