आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी केली. तर अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन मॅक्सवेलने वादळी खेळी केली. यादरम्यान, नेदरलँडचा गोलंदाज बास डी लीडे याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची डी लीडेच्या १० षटकांमध्ये ११५ धावा कुटून काढल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठल्याही गोलंदाजाने एका सामन्यात दिलेल्या ह्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजाने नेदरलँड्सच्या एकेका गोलंदाजाची धुलाई केली. यात अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजांवर तुटूनच पडला. या धुलाईमध्ये सर्वाधिक मार बसला तो बास डी लीडे याला. बास डी लीडेने टाकलेल्या १० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ११५ धावा कुटून काढल्या. त्याचा गोलंदाजीवर १३ चौकार आणि ६ षटकार ठरले. डी लीडेचा आजचा स्पेल हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल ठरला आहे.
याआधी २००६ साली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जोहान्सबर्ग येथे झालेल्या ऐतिहासिक सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसच्या गोलंदाजीवर ११३ धावा कुटल्या गेल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्याच अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ११३ धावा कुटल्या होत्या. अखेर ऑस्ट्रेलियाच्या दोन गोलंदाजांच्या नावावर असलेला हा नकोसा विक्रम आज मोडला गेला आहे.
दरम्यान, या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये ३९९ धावा कुटल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नेदरलँड्सचा डाव ९० धावांतच गुंडाळला. त्याबरोबरच ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.