अयाज मेमन कन्सल्टिंग एडिटर: बांगलादेशला कसोटी मालिकेत २-० ने नमविल्यानंतर कुणीही चाहता म्हणेल की ही फार मोठी गोष्ट नाही. बांगलादेश संघाच्या खेळाचा दर्जा उच्चप्रतीचा नसला तरी भारताने ज्या थाटात विजय साजरा केला, तो विशेष आहे. चेन्नईत पहिल्या कसोटीत पहिल्या डावात आघाडीची फळी कोसळल्यानंतरही रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी रोहित शर्माची चिंता दूर केली. चेन्नईतील विजय भारतीय संघाच्या फलंदाजीतील विविधता दर्शवितो.
संघाच्या आत्मविश्वासात भर पडते
वारंवार कर्णधारबदल न केल्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ ताकदवान झाले आहेत. या दोन्ही संघांचे खेळाडू जेव्हा एकमेकांविरुद्ध भिडतात तेव्हा ते पूर्ण शक्ती पणाला लावत असतात. या संघांनासुद्धा भरपूर अपयशाचा सामना करावा लागला. पण म्हणून त्यांनी सतत नेतृत्वबदल केला नाही. त्यामुळे संघात स्थिरता असेल तर आत्मविश्वासात भर पडते. अशावेळी संघ केवळ जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरत असतो.
महत्त्वाकांक्षा टीम इंडियाची...
कानपूरमध्ये झालेला दुसरा सामना भारताने दोन दिवसांतच जिंकला. सामना पाचव्या दिवशी संपला तरी पावसामुळे बराच वेळ वाया गेला होता. रोहितला जाणीव होती की, डब्ल्यूटीसी गुणतालिकेत अव्वल स्थान भक्कम करण्यासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याने जोखीम पत्करून संधी शोधली. मोक्याच्या क्षणी त्याने डाव घोषित केला. त्याआधी फलंदाजांनी कर्णधाराला साथ देत आठपेक्षा अधिक सरासरीने धावा काढल्या. कसोटीत ही सरासरी तोंडात बोटे घालायला भाग पाडणारी आहे. यामुळे भारताची महत्त्वाकांक्षा सिद्ध झाली. याआधी अशी कामगिरी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाकडून घडताना आपण पाहिली आहे. या दोन्ही संघांचा उद्देश एकच असायचा तो हा की परिस्थिती कशीही असो, ‘विजय’ मिळवायचाच...
वारंवार नेतृत्वबदल होत नाही
भारतीय संघाकडून अशा प्रकारच्या क्रिकेटची कोणी अपेक्षाही केली नव्हती. पण आता काळ बदलेला आहे. केवळ जिंकण्यासाठी खेळायचे ही संस्कृती गेल्या १५ वर्षांपासून विकसित झाली आहे. प्रत्येक खेळाडू केवळ जिंकण्याच्याच भावनेने खेळतो. सौरव गांगुलीपासून सुरू झालेला हा शिरस्ता आता रोहित शर्मांपर्यंत आला आहे. याला अजून एक कारण आहे. ते म्हणजे स्थिर नेतृत्व. कारण वारंवार कर्णधार बदलल्याने संघ अस्थिर होतो. खेळाडू स्वत:ला असुरक्षित समजायला लागतात. सध्या पाकिस्तान संघ याचे ताजे उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केवळ भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच संघ असे आहेत ज्यांनी कर्णधारपदाबाबत स्थिरता ठेवली.