भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे खेळ भावनांचा. हे कट्टर प्रतिस्पर्धी द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी अवघे क्रिकेट विश्व आतुर असते. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी हा बहुचर्चित सामना झाला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने सहा धावांनी बाजी मारली. पाकिस्तानच्या पराभवानंतर शेजारील देशातील चाहत्यांसह माजी खेळाडू बाबर आझमच्या संघावर सडकून टीका करत आहेत. अशातच पाकिस्तानातील कराची येथे युट्यूबरची हत्या झाल्याचे कळते. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल व्हिडीओ बनवत असलेल्या युट्यूबरला गोळ्या झाडण्यात आल्या.
पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, साद अहमद नावाचा YouTuber मोबाईल मार्केटमध्ये गेला आणि सुरक्षा रक्षकाला भेटण्यापूर्वी अनेक दुकानदारांचे व्हिडीओ बाइट्स घेतले आणि त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साद अहमदच्या या कृत्यामुळे सुरक्षा रक्षक संतापला होता. त्याला यामध्ये काहीच रस नव्हता. मग संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने युट्यूबरला गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात साद अहमदचा मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याला 'मृत' घोषित करण्यात आले.
दरम्यान, रविवारी न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. पाकिस्तानला यासह सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. याआधी यजमान अमेरिकेने पाकिस्तानला नमवून क्रिकेट विश्वाला धक्का दिला.
पाकिस्तानचा दुसरा पराभव पाकिस्तानचा पराभव करताच भारताने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. तर पाकिस्तानला या पराभवासह सलग दुसऱ्यांदा हार पत्करावी लागली. त्यांना सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिकेने पराभवाची धूळ चारली होती. भारतीय संघाने आयर्लंडला नमवून विजयी सलामी दिली. त्यामुळे पाकिस्तानला सुपर ८ मध्ये पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. किंबहुना शेजाऱ्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.