Rohit Sharma Virat Kohli Team India, IND vs NZ 3rd Test: न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात मायदेशात व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी साऱ्यांनाच निराश केले. रिषभ पंत, शुबमन गिल, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर या काही मोजक्या खेळाडूंनीच लौकिकाला साजेशी खेळी केली. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन बड्या फलंदाजांनी चाहत्यांची घोर निराशा केली. आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात दोघांनीही अतिशय सुमार दर्जाची फलंदाजी केली. तीन सामन्यांतील ६ डावांत मिळून विराटने ९३ तर रोहितने ९१ धावा केल्या. या दोघांच्या वाईट कामगिरीवरून भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्राने त्यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
"आपण जर विराट कोहली किंवा रोहित शर्मा बद्दल बोलत असू तर ही त्यांच्या शेवटची सुरुवात आहे का? ते न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत अजिबातच चांगले खेळले नाहीत. आपल्या घरच्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करता येऊ शकत होती. त्यांचे आकडेही चांगले होते. पण या मालिकेतील त्यांची आकडेवारी पाहून वाईट वाटते जर इतकी वाईट आकडेवारी पाहूनही तुम्हाला भीती वाटत नसेल, तर कदाचित तुम्ही त्याकडे डोळेझाक करताय किंवा तुम्हाला त्याकडे योग्य नजरेने पाहायचंच नाही. हे खरंतर विराट कोहली किंवा रोहित शर्माचे आकडेवारी असू शकत नाहीत. त्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ अजिबात केलेला नाही," अशी टीका आकाश चोप्राने केली.
"रोहित शर्माच्या खेळाबाबत बोलायचं झाले तर त्याच्या पॅड आणि बॅट मधील अंतर हे त्याच्यासाठी सर्वात मोठे काळजीचे कारण आहे. ही गोष्ट अशीच कायम राहिली तर समस्या इथेच संपणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही रोहितला या समस्येला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे त्यांनी यावर आत्ताच काम करणे अपेक्षित आहे. घरच्या मैदानावर दहा कसोटी डाव खेळायला मिळणे ही छोटी गोष्ट नाही. त्यात जर तुम्ही केवळ एक अर्धशतक ठोकले असेल आणि अवघ्या १३ धावांच्या सरासरीने फलंदाजी केली असेल, तर ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे. विराट कोहली किंवा रोहित शर्माच्या बाबतीत इतकी खराब कामगिरी पहावी लागेल असा कोणीच विचार केला नव्हता," असे रोखठोक मत आकाश चोप्राने मांडले.