LSG vs RCB । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धची लोकेश राहुलची (KL Rahul) खेळी पाहून एक विधान केले आहे. लखनौ सुपर जायंट्सने आरसीबीविरूद्ध (RCB vs LSG) अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. पण कर्णधार लोकेश राहुल त्याच्या खेळीवर संतुष्ट नव्हता. त्याने कमी स्ट्राईक रेटचा दाखला देत ही प्रामाणिक कबुली दिली. अशातच आकाश चोप्राने राहुलच्या या खेळीवरून स्वत:चीच खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, लोकेश राहुलची फलंदाजी पाहून असे वाटते की मीच खेळतोय असे आकाश चोप्राने म्हटले. खरं तर आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरूवात केली. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या त्रिरत्नांनी अर्धशतकी खेळी करून पाहुण्या लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आरसीबीने निर्धारित २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या. मात्र, आरसीबीने दिलेल्या २१३ या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा कर्णधार राहुलने सावध खेळी केली. त्याच्या संघाने पॉवरप्लेच्या पहिल्या ४ षटकांत केवळ २३ धावा केल्या आणि ३ गडी गमावले. यादरम्यान राहुल खूप धिम्या गतीने फलंदाजी करत होता. त्याने खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण तो २० चेंडूत १८ धावा करून बाद झाला.
राहुलच्या या धिम्या खेळीचा दाखला देत आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले, "राहुलची फलंदाजी पाहून असे वाटत होते की, मीच फलंदाजी करत आहे. कारण राहुल देखील चेंडूप्रमाणेच धावा करत होता. विकेट जात होत्या पण राहुलने धावा करणे गरजेचे होते. या हंगामात तो चांगल्या फॉर्ममध्ये नाही पण त्याने धावा नाही केल्या तर लखनौच्या संघाच्या अडचणी वाढतील."
अखेरच्या चेंडूवर लखनौचा विजय काल झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौने ९ गडी गमावून २१३ धावा करून विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर एक धाव काढून आवेश खानने संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनौने ६ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान गाठले.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ धावा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. तर लखनौकडून मार्क स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी स्फोटक खेळी करून आरसीबीचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली. स्टॉयनिसने ३० चेंडूत ६५ आणि निकोलस पूरनने १९ चेंडूत ६२ धावांची मोठी खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"