Team India Playing XI vs Bangladesh 1st T20: टीम इंडियाने बांगलादेश विरूद्ध कसोटी मालिका २-० ने जिंकली. आजपासून भारत आणि बांगलादेश ( IND vs BAN) यांच्यात तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला संधी मिळेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघे सलामीवीर म्हणून खेळतील असे कालच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पण इतर खेळाडू कोण असावेत, याबाबत प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने ( Aakash Chopra ) मत व्यक्त केले.
"१५ जणांच्या चमूमधून सर्वोत्तम ११ खेळाडू निवडणे म्हणजे डोकेदुखीच आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की ज्या ११ खेळाडूंना तुम्ही पहिल्या सामन्यात संधी देत आहात, त्यांना सर्व तीन सामन्यात संधी द्या. तुमच्याकडे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघे सलामीवीर आहेत. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याही संघात असणारच. ५ नंबरवर रिंकू सिंग खेळेल यातही वाद नाही. ६ नंबरवर तुम्ही रियान परागला खेळवाल की इतर कोणाचा विचार कराल? रियान परागला संघात घेतले तर त्याला सहाव्या क्रमांकावर खेळवा.
सातव्या नंबरवर ऑलराऊंडरची गरज असेल. इथूनच संघ निवडण्याची कसोटी आहे. सातव्या क्रमांकावर नितीश रेड्डीला संघात खेळवता येईल. आणि जर आठव्या क्रमांकावर फलंदाज हवा असेल तर वॉशिंग्टन सुंदरला संघात खेळवता येईल. आता शेवटच्या तीन जागांचा प्रश्न उरला आहे. त्यात हर्षित राणा, मयंक यादव आणि अर्शदीप सिंग असे तीन वेगवान गोलंदाज खेळवता येतील. जर स्पिनर हवा असेल तर रवी बिश्नोई आणि वरूण चक्रवर्तीला संघात घेता येईल," असे आकाश चोप्रा म्हणाला.
आकाश चोप्रा याने निवडलेलं भारताचं प्लेइंग ११ - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी / वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव / रवी बिश्नोई / वरुण चक्रवर्ती
टी२० मालिकेआधी भारताला धक्का
मालिका सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे याने मालिकेतून माघार घेतली. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. दुबेच्या जागी तिलक वर्माला संघात स्थान मिळाले आहे.