WPL 2024 : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमिअर लीग २०२४ जिंकली. RCB च्या या जेतेपदाचा बंगळुरूत रात्रभर जल्लोष साजरा केला गेला. रस्त्यांवर चाहते फटाके फोडताना, नाचताना दिसले. आता RCB च्या चाहत्यांना आयपीएल २०२४ च्या जेतेपदाची स्वप्न पडू लागली आहेत. विराट कोहलीच्या RCB ला एकदाही आयपीएल जेतेपद जिंकता आलेले नाही आणि यावेळी फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली हा दुष्काळ संपेल अशी चाहत्यांना आशा आहे. WPL विजेतेपदानंतर भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने कर्णधार स्मृती मानधनासमोर गुगली प्रश्न टाकला.
WPL च्या पहिल्या पर्वात बंगळुरूला शेवटच्या क्रमांकावर राहावे लागले होते आणि तेव्हा विराटने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन महिला क्रिकेटपटूंचे मनोबल उंचावले होते. त्यांना आधार दिला होता. पण, आता WPL जिंकल्यावर स्मृतीला प्रश्न विचारला गेला. आकाश चोप्राने विचारलं, स्मृती एक छोटासा प्रश्न विचारतो. मागच्या पर्वात विराट कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये येऊन महिला खेळाडूंचे मनोबल उंचावले होते. आता तू पुरूष संघाला जेतेपद कसं जिंकायचं याचे मार्गदर्शन करशील का?
त्यावर स्मृती सुरुवातीला हसली आणि म्हणाली, हा खूप अवघड प्रश्न आहे आणि याचे उत्तर जरा विचार करून द्यावे लागेल, नाहीतर वाद निर्माण होऊ शकतो. पण, विराट कोहलीने भरपूर काही अचिव्ह केले आहे आणि तो दिग्गज आहे. त्याने वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. फ्रँचायझी क्रिकेट हे नशीबावर अवलंबून आहे, मला आशा आहे की यावेळी लक RCB च्या बाजूने असेल.