Join us

आला रे... जसप्रीत बुमराहचे जंगी पुनरागमन; थेट झाला कर्णधार! पाहा भारताचा संघ

Jasprit Bumrah, Team India: तब्बल वर्षभराने जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 20:13 IST

Open in App

Jasprit Bumrah comeback, Team India, IND vs IRE: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे अखेर संघात पुनरागमन झाले. भारतीय संघाच्या आगामी टी२० आयर्लंड दौऱ्यासाठी नुकताच बीसीसीआयने संघ जाहीर केला. यात मागील जवळपास एक वर्षापासून पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेल्या बुमराहला थेट कर्णधारपद देण्यात आले आहे. तर उपकर्णधार पदाची माळ मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या गळ्यात पडली आहे.

भारताचा टी२० संघ- जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसीध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

अलीकडेच, बीसीसीआयने त्याच्याबद्दल हेल्थ अपडेट देखील जारी केले होते. तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत आहे आणि लवकरच पुनरागमन करू शकतो असे यात सांगण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दोन दिवसांपूर्वीचे बुमराहच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. त्यानुसार आयर्लंड दौऱ्यावर बुमराहचे पुनरागमन झाले आहे.

असा असेल आयर्लंड दौरा-

भारताला पुढील महिन्यात १८ ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. दुसरा T20 सामना 20 ऑगस्टला आणि तिसरा T20 सामना 23 ऑगस्टला खेळवला जाईल. तिन्ही सामने डब्लिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळवले जातील. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आशिया चषक आणि विश्वचषक पाहता या T20 मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्याचबरोबर काही आयपीएल स्टार्सनाही या मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती

या वर्षी मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या T20I मालिकेनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी केलेल्या टाइमलाइननुसार, बुमराह आधी ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठीच परतण्याची अपेक्षा होती. मात्र, बीसीसीआयने मेडिकल अपडेट जारी करून बुमराह लवकरच तंदुरुस्त होण्याची आशा व्यक्त केली होती. त्यानुसार त्याचे कमबॅक झाले आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघआयर्लंड
Open in App