ब्रिस्बेनच्या गाबा कसोटी सामन्यानंतर रोहित शर्मानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक भावूक क्षण अनुभवायला मिळाला. कारण कर्णधार रोहित शर्माच्या बाजूला बसून आर. अश्विन याने प्रसारमाध्यमांसमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्टार ऑलराउंडर ब्रिस्बेन कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्यामुळे अॅडिलेड कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना ठरला. अश्विनच्या निवृत्तीवर भाष्य करताना रोहित शर्मानं आम्ही चांगले मित्र आहोत. तो ड्रेसिंग रुममध्ये नसला तरी यापुढेही आम्ही एकमेकांना भेटत राहू, असे तो म्हणाला आहे.
नेमकं काय म्हणाला रोहित?
ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणे आणि पुजाराच्या नावाचा उल्लेख करत रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही मुंबईत बऱ्याचदा अगदी सहज भेटतो. पुजारा राजकोटमध्ये लपून बसलेला असतो. पण क्रिकेट फिल्डवर आमची कुठं ना कुठं भेट होत असते. अश्विनही पुढचे एक दोन वर्षे आपल्यासोबत असेल, याची खात्री आहे. त्यामुळे आपण त्याला भेटत राहू. अश्विन हा एक मॅच विनर प्लेयर होता. त्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे निश्चितच त्याची उणीव भासेल.
'आप लोग मुझे मरवावोगे यार...' असं का म्हणाला रोहित?
अश्विनसंदर्भात बोलताना भारतीय कर्णधारानं पुजारा-अजिंक्य रहाणे यांच्या नावाचा दाखला दिला. ही मंडळी माझ्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला दिसणार नाहीत. असे बोलता बोलता रोहित अचानक थांबला. 'आप लोग मुझे मरवावोगे यार...' असं म्हणत त्याने अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांनी निवृत्ती घेतलेली नाही, ही गोष्ट अगदी स्पष्टपणे मांडली. जेणेकरून याचा वेगळा अर्थ लावला जाणार नाही. अश्विननं अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केली आहे, असे सांगताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठी आजही टीम इंडियाचे दरवाजे खुले आहेत, असे रोहित शर्मा म्हणाला.
सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरलाय अश्विन
अश्विन हा भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विननं आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत एकून ७६५ विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५३ विकेट्स घेतल्या आहेत.