- प्रसाद लाडएबी डी'व्हिलियर्सच्या निवृत्तीनं क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला. एबीचे हे वय निवृत्तीचे नक्कीच नाही. तो चांगल्या फॉर्मात होता. बॅटला गंज लागलेला नव्हता किंवा क्षेत्ररक्षणासाठी चपळता नव्हती, असं काहीच नव्हंत. आयपीएलमधला अॅलेक्स हेल्सचा जो झेल त्याने सीमारेषेवर पकडला त्याच्यासाठी शब्द अपुरे पडत होते. पण तरीही त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला, ही गोष्ट पचनी पडण्यासारखी नक्कीच नाही. ट्विटरवर त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. आतापर्यंत त्याच्यावर बराच स्तुतिसुमनांचा वर्षाव झाला. पण या साऱ्यामध्ये एक गोष्ट बरीच जणं विसरली, ती म्हणजे संघाला गरज असताना त्याने घेतलेली निवृत्ती.
एबीने आपला निर्णय घेतला. निवृत्ती जाहीर केली. पण संघाला आपली किती गरज आहे, हे त्याने पाहिले नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ ' चोकर्स ' या नावाने कुप्रसिद्ध आहे. आतापर्यंत एकदाही त्यांना विश्वचषक जिंकता आलेला नाही. आता आगामी विश्वचषक फक्त वर्षभरावर येऊन ठेपला आहे. या विश्वचषकासाठी संघाला एबीची नितांत गरज होती. फक्त त्याच्या उपस्थितीने संघाचे मनोबल उंचावले असते. एबी मैदानात आहे म्हटल्यावर, संघाला विजयाची आशा असली असती. पण संघाची ही गरज एबीने लक्षात न घेता निवृत्ती पत्करली. ही एबीने संघाशी केलेली प्रतारणा नाही का? या प्रश्नावर विचार व्हायला हवा.
दक्षिण आफ्रिकेच्या संघातून एबीने प्रथम खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतरच त्याची क्रिकेट जगताला ओळख झाली. त्याच्या गुणवत्तेला दक्षिण आफ्रिकेने पहिले व्यासपीठ दिले. जर हे व्यासपीठ मिळाले नसते तर एबी नावाचा अवलिया आपल्याला दिसलाही नसता. एबीनेही या संधीचे सोने केले. भरभरून धावा लुटल्या. पण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संघ आपल्याला मोठं करतो, आपली गरज पुरवतो, आपल्याला संधी देतो, तेव्हा आपणंही समोरच्याची गरज जाणून निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. नेमकं तेच 'जंटलमन' एबीने केलं नाही.
मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत असल्याचं म्हणत असताना मी क्लब क्रिकेट खेळत राहीन, असं एबी म्हणाला. म्हणजेच तो आयपीएल, बिग बॅश आणि जगभरातल्या साऱ्याच लीग खेळायला मोकळा झाला आहे. जर तो लीग क्रिकेट खेळू शकतो, तर तो देशासाठी पुढचा विश्वचषक का खेळू शकत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. फुटबॉलमध्ये आपण पाहतो की, खेळाडू देशापेक्षा क्लबला जास्त महत्व देताना दिसतात, त्याचाच पायंडा कुठेतरी एबी घालत असल्याचे दिसत आहे. पैशाच्या मागे धावायचे आणि देशाला मात्र वाऱ्यावर सोडायचे, हेच कुठेतरी फुटबॉलपटूप्रमाणे एबीही करताना दिसत आहे. असे करणारा एबी हा पहिला खेळाडू नाही. पण एबीसारख्या आदर्शवत खेळाडूने तरी असे करू नये, एवढेच वाटते.