इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात जे कधीच घडले नाही, ते आज घडले... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) आज ख्रिस गेल व एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers and Chris Gayle) या माजी खेळाडूंबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. RCBने आयपीएलमध्ये प्रथमच हॉल ऑफ फेमची ( Hall of Fame ) प्रथा सुरू केली आणि त्यांनी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल यांची RCBच्या Hall of Fame मध्ये निवड केली आहे. आयपीएलमध्ये प्रथमच एखाद्या फ्रँचायझीने असा उपक्रम राबवला आहे. आयपीएलमधील दोन दिग्गज म्हणून या दोघांची ओळख आहे आणि त्यांचा फॅन फॉलोअर्सची प्रचंड आहे. या दोघांनीही RCB चे प्रतिनिधित्व केले आहे. एबी डिव्हिलियर्सने RCBकडून १५७ सामन्यांत ४१.१०च्या सरासरीने ४५२२ धावा केल्या असून त्यात २ शतकं व ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. गेलने ९१ सामन्यांत ४३.२९च्या सरासरीने ३४२० धावा केल्या आहेत आणि त्यात ५ शतकं व २१ अर्धशतकं आहेत. बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने या दोघांचेही आभार मानले. २०११साली या दोघांसोबत झालेल्या भेटीमुळे ते पर्व खास असल्याचे विराटने सांगितले. तो म्हणाला, तुम्हा दोघांना हा सन्मान मिळणे, हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. तुम्ही आयपीएलचं रुपडं कसं बदललं हे आम्ही पाहिलेय... या दोन खेळाडूंचा आयपीएलवर प्रचंड प्रभाव आजही आहे. मी एबीडीसोबत ११ वर्ष खेळलोय आणि गेलसोबत ७ वर्ष.. या दोघांसोबतचा प्रवास २०११मध्ये सुरू झाला आणि ते वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे.
दरम्यान, या दोन्ही खेळाडूंना RCB मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.