नवी दिल्ली - आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा गुणवान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून डिव्हिलियर्सने पहिले स्थान पटकावले आहे. शुक्रवारी आयसीसीने वनडेमधील फलंदाज आणि गोलंदाजांची रँकिंग जाहीर केली. कोहली 877 गुणांसह दुस-या तर, डिव्हिलियर्स 879 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. फक्त दोन गुणांच्या फरकाने कोहली दुस-या स्थानावर गेला.
काल गुरुवारी पार्ल येथे बांगलादेश विरुद्धच्या दुस-या सामन्यात डिव्हिलियर्सने तुफानी फटकेबाजी करत 104 चेंडूत 176 धावा चोपून काढल्या. यात 15 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 353 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 104 धावांनी विजय मिळवला. या खेळीमुळेच डिव्हिलियर्सला वनडे रँकिंग अव्वल स्थानावर पोहोचता आले.
गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा हसन अली पहिल्या स्थानावर आहे. डिव्हिलियर्सने वनडे रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवण्याची ही चौदावी वेळ आहे. 30 मे 2010 रोजी डिव्हिलियर्सने पहिल्यांदा वनडेमध्ये अव्वल स्थान पटकावले.
वनडे रँकिंगमध्येही भारत दुस-या नंबरवर आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्येही भारतीय संघ दुस-या स्थानावर गेला आहे. मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाला 4-1 ने नमवून भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोघांचे 120 गुण असले तरी, दशांश गुणाचा फरक असल्याने दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेश विरुद्ध तिसरा सामना जिंकल्या दक्षिण आफ्रिकेचे 121 गुण होतील. रविवारपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. भारताने ही मालिका जिंकली तर, भारत पुन्हा नंबर 1 वर पोहोचेल.