AB De Villiers on Virat Kohli Batting, IPL 2022: भारताचा आणि RCBचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून लय शोधण्यासाठी धडपडत आहेत. त्याला फलंदाजीत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या IPL हंगामात विराट कोहलीने फारशी चमक दाखवलेली नाही. पहिल्या ९ सामन्यात त्याला एकही अर्धशतक करता आले नव्हते. पण गेल्या सामन्यात त्याने ५८ धावांची खेळी केल्यामुळे त्याच्या १० डावांत १८६ धावा झाल्या आहेत. या दरम्यान, विराटच्या फलंदाजीच्या फॉर्मबद्दल त्याचा खास मित्र दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स याने महत्त्वाचे मत व्यक्त केले.
"फलंदाज केवळ एक-दोन डाव खराब खेळला की हळूहळू त्याच्यावर टीका होते आणि तो खराब फॉर्ममध्ये खेळतोय अशी चर्चा रंगते. अशा चर्चा सुरू असताना खराब कामगिरीवर मात करून दमदार पुनरागमन करणं जास्त कठीण होऊन बसतं. खराब फॉर्म म्हणजे बळ आणि मन यांच्यातील संघर्ष असतो. मी त्याची तीव्रता किंवा टक्केवारी सांगू शकत नाही, पण तसं काही असेल तर त्याचा परिणाम नक्कीच होतो. तुम्ही एका रात्रीत वाईट फलंदाज होत नाही. विराटला देखील ही गोष्ट माहिती आहे. तुम्ही स्वत:चं मन आणि विचार कशापद्धतीने हाताळता त्यावर सगळं अवलंबून असतं", असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.
"फॉर्ममध्ये परतायचं असेल तर विराटला त्याचे विचार अतिशय स्पष्ट ठेवावे लागतील. मैदानात गेल्यावर गोलंदाजांवर हल्ला चढवायचा की शांततापूर्वक मोठी खेळी खेळायची याची तयारी मनात आधीच करून जायला हवी. विचार जर स्पष्ट असतील, पारदर्शक असतील तर विराटला किंवा इतर कोणत्याही खेळाडूला खराब फॉर्ममधून बाहेर पडणं सहज शक्य होऊ शकेल", असे डिव्हिलियर्सने नमूद केले.
Web Title: AB de Villiers has an interesting take on Virat Kohli form for RCB in IPL 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.