मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा संघ जेतेपदाच्या दावेदारांत अग्रस्थानी असेल असं भाकित केलं आहे. त्याचवेळी त्यानं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा वन डे क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे, असे मतही व्यक्त केलं. गतवर्षी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानं तीन वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासह यजमान इंग्लंड, गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हेही जेतेपदाच्या शर्यतीत असतील, असे एबी म्हणाला. पण, त्यानं दावेदारांमध्ये आफ्रिकेच्या नावाचा उल्लेखही केला नाही.
दक्षिण आफ्रिकेने 2015 साली उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि त्यांना चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. 2007 आणि 1999 मध्येही त्यांना उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही.
तो म्हणाला,''वर्ल्ड कप ही आव्हानात्मक स्पर्धा असते. मी तीन वर्ल्ड कप स्पर्धा खेळलो आहे. प्रत्येक वेळी आपण उत्तम संघ घेवून वर्ल्ड कपमध्ये उतरलो आहोत, असे वाटायचे. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेत प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा वरचढ आहेत, याची जाण व्हायची. आफ्रिकेलाही संधी आहे, परंतु ते जेतेपदाचे दावेदार आहेत असा दावा मी करणार नाही. भारत आणि इंग्लंड हे संघ बलाढ्य दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाने पाच वर्ल्ड कप जिंकले आहेत आमि पाकिस्तानने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स चषक उंचावला आहे. त्यामुळे हे चार संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील. ''
या चार संघांपैकी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वरचढ ठरेल, असेही एबीला वाटते. एबीनं कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला,''मागील वर्षभरात विराटची कामगिरी अविश्वसनीय झालेली आहे आणि तो इतक्यात थांबेल असे मला वाटत नाही. आयपीएलमध्ये मी त्याच्यासोबत गेली आठ वर्षे खेळत आहे आणि त्याच्याकडून त्याचा क्लास कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तो मानसिकदृष्ट्या प्रचंड कणखर आहे आणि त्यामुळेच तो जगातील सर्वोत्तम खेळाडू ठरतो.''
Web Title: AB de Villiers has named the four teams he thinks will go far in #CWC19 – and South Africa aren't among his favourites!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.