नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेला टी-20 विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही गटातून प्रत्येकी 2-2 संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान या संघाना उपांत्य फेरीत जागा मिळाली आहे. खरं तर बुधवारी उपांत्य फेरीतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना गुरूवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार का अशी चर्चा रंगली असताना मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सने मोठे विधान केले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याने ट्विटच्या माध्यमातून विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार का याची चाचपणी केली आहे. यासाठी मिस्टर 360ने क्रिकेटप्रेमींचा कल घेतला यामध्ये 75 टक्के लोकांनी भारत-पाकिस्तान यांच्यात फायनलचा सामना होणार असल्याचे म्हटले आहे.
क्रिकेटप्रेमींचा कल पाहिल्यावर डिव्हिलियर्सने आणखी एक ट्विट केले आहे. "फँटसी फायनल खरंच! आतापर्यंत 70% लोकांनी भारत-पाकिस्तान फायनल होणार असे मत दिले आहे, परंतु मला खात्री आहे की NZ आणि ENGला त्याबद्दल काहीतरी सांगायचे असेल. दोन्ही संघांमध्ये शानदार खेळाडूंची फळी आहे आणि ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोन सेमीफायनल लढती होणार आहेत. माझे देखील मत भारत-पाकिस्तान फायनलला जाते." अशा आशयाचे ट्विट करून डिव्हिलियर्सने भारत-पाकिस्तान यांच्यात फायनलचा सामना झाला आणखी थरार रंगेल असे म्हटले.
13 तारखेला होणार अंतिम सामना
रविवारी टी-20 विश्वचषकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नवख्या नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पाकिस्तानचा फायदा करून दिला. त्यानंतर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील पाकिस्तानचा सामना 9 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. तर 10 तारखेला दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाईल. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: AB de Villiers has said that the T20 World Cup final will be between India and Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.