ढाका : गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एबी डिव्हिलियर्सने ट्वेंटी-20 लीगमध्ये आपला धडाका कायम राखला आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये त्याने रंगपुर रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ढाका डायनामाईट्स संघावर 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात रायडर्सने 187 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत पूर्ण केले. डिव्हिलियर्सची विक्रमी खेळी या सामन्यात लक्षवेधी ठरली.
या सामन्यात डिव्हिलियर्सने 50 चेंडूंत नाबाद 101 धावा चोपल्या. डिव्हिलियर्सने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. रायडर्सचे सलामीचे फलंदाज 5 धावांवर माघारी परतले होते, परंतु डिव्हिलियर्स आणि अॅलेक्स हेल्स ( नाबाद 85) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.
डिव्हिलियर्सची विक्रमांची रांग
- डिव्हिलियर्सचे हे ट्वेंटी-20 कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. चार ट्वेंटी-20 शतक करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला आहे. डिव्हिलियर्स व्यतिरिक्त क्विंटन डी'कॉकने चार शतकं केली आहेत.
- डिव्हिलियर्सने 50 चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याच्या चार ट्वेंटी-20 शतकांमधील हे सर्वात जलद शतक ठरले. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 50पेक्षा कमी चेंडूंत तीनपेक्षा अधिक शतकं केली आहेत. गेलने 9 वेळा अशी कामगिरी केली आहे. ब्रँडन मॅक्युलम, अॅरोन फिंच, ल्यूक राईट्स यांनी तीनवेळा 50 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत शतकं केली आहेत.
- डिव्हिलियर्स आणि हेल्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी आहे.