AB De Villers Retirement Anushka Sharma First Reaction: दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने १९ नोव्हेंबर २०२१ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठच IPL आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 'क्रिकेटमधील माझा प्रवास खूपच छान होता. पण आता मी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला', असं ट्वीट त्याने केलं होतं. या निर्णयाबद्दल डिव्हिलियर्सने व्हाईस नोट पाठवून विराट कोहलीला ( Virat Kohli ) कल्पना दिली होती. ती व्हॉईस नोट ऐकताना विराटची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील त्याच्यासोबत होती. त्यामुळे हा निर्णय ऐकून तिची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल विराटने नुकतंच RCBच्या एका व्हिडीओमध्ये सांगितलं.
"मी ड्रायव्हिंग करत होतो. अनुष्का माझ्या बाजूलाच बसली होती. त्यावेळी डिव्हिलियर्सची व्हॉईस नोटी माझ्या मोबाईलवर आली. त्यात त्याने सर्व प्रकारचं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. मी ते ऐकलं आणि अनुष्काला सांगितलं. त्यावेळी अनुष्काची पहिली प्रतिक्रिया होती, "काय"... त्यानंतर मी तिला डिव्हिलियर्सची व्हॉईस नोट ऐकवली. त्यावर ती म्हणाली, "मला हे मान्यच नाही", असं किस्सा विराटने RCBच्या व्हिडीओ दरम्यान सांगितला.
दरम्यान, डिव्हिलियर्सने आपल्या ट्वीटमधून निवृत्तीच्या वेळी भावनिक मेसेज लिहिला होता. 'माझ्या भावंडांसोबत घराच्या अंगणात क्रिकेट खेळण्यापासून माझा प्रवास सुरू झाला होता. मी खेळाचा आनंद घेत क्रिकेट खेळलो. अनेकांनी मला प्रोत्साहित केलं आणि मला चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण आता वयाच्या ३७व्या वर्षी मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत आहे', असं ट्वीट त्याने केलं होतं.
RCB बद्दल काय लिहिलं होतं?
"रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना मला क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेता आला. ११ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही. कटू-गोड आठवणींचा ठेवा सोबत घेऊन मी क्रिकेटचा निरोप घेत आहे. निवृत्तीचा निर्णय घेणं हे माझ्यासाठी नवीन नसलं तरी कठीण होतं. पण माझ्या कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवण्यासाठी मी अखेर निवृत्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. मी RCB च्या संघ व्यवस्थापनाचे, माझा मित्र विराट कोहलीचे आणि साऱ्यांचे आभार मानतो", अशा भावना डिव्हिलियर्सने व्यक्त केल्या होत्या.