AB de Villiers Retirement: ट्वेंटी-२०चा खरा थरार अनुभवायचाय तर 'Mr. 360' म्हणजेच एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीचा आस्वाद लुटायलाच हवा... स्टेडियमचा असा कोणताही कानाकोपरा नसेल, जिथे एबीनं चेंडू भिरकावला नसेल, स्कूप, स्ट्रेट ड्राईव्ह, पुल, लेट कट, अपर कट, कव्हर ड्राईव्ह असे भात्यातील सर्वच फटके एबीच्या बॅटीतून अगदी सहजतेनं गोलंदाजांच्या गोलंदाजीची कत्तल करून जायचे.. त्यात गुडघ्यावर बसून उत्तुंग टोलावलेला त्याचा षटकार म्हणजे सोने पे सुहागाच... पण, आता क्रिकेटच्या मैदानावर डोळ्यांचे पारणे फेडणारी ही फटकेबाजी पाहायला मिळणार नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ( RCB) प्रमुख फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ३७ वर्षीय एबीच्या या निर्णयाचा सामान्य क्रिकेटचाहत्यांना जेवढा धक्का बसला, त्याहून अधिक धक्का हा RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला बसला. RCBमधील आपला बडी, मोठा भाऊ आता खेळपट्टीवर सोबत नसेल याचे दुःख त्याला आहे.
Virat Kohli pens emotional tribute for AB de Villiers : एबीनं २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो इंडियन प्रीमिअऱ लीगमध्ये RCBकडून खेळत होता. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून सुरुवात करणारा एबी चौथ्या पर्वात RCBच्या ताफ्यात आला आणि विराट कोहली व त्याच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले. त्यांच्या मैत्रीचं सारेच कौतुक करतात. त्याच्या निर्णयानंतर विराटनं केलेल्या ट्वीटमधून त्यांचे नाते किती घट्ट होते, हे अधोरेखित केले. विराटनं लिहिलं की,''यावेळी माझं मन दुखी आहे, परंतु मला हे माहित्येय की हा निर्णय तू स्वतःसाठी आणि कुटुंबीयांसाठी घेतला आहे. I Love You. आमच्या काळातील तू सर्वोत्तम खेळाडू आहेस आणि माझ्यासाठी प्रेरणास्थानी आहेस. तुला तुझ्या कारकीर्दिचा अभिमान वाटायला हवा. RCBसाठीही तू बरेच काही दिले आहेस. या खेळापलीकडचे आपले नाते आहे आणि ते यापुढेही तसेच राहील.''
आयपीएलमध्ये एबीनं १८४ सामन्यांत ३९.७०च्या सरासरीनं ५१६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३ शतकं व ४० अर्धशतकं आहेत आणि नाबाद १३३ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानं ४१३ चौकार व २५१ षटकार खेचले आहेत.
विराट व एबी यांनी RCBला अनेक सामने जिंकून दिले. या दोघांच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आहे. विराट व एबी यांनी गुजरात लायन्सविरुद्ध १४ मे २०१६मध्ये २२९ धावांची भागीदारी केली होती. कोहलीनं ५५ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकांराच्या मदतीनं नाबाद १०९ धावा केल्या होत्या. तर एबीनं ५२ चेंडूंत १० चौकार व १२ षटकारांसह नाबाद १२९ धावा चोपल्या होत्या.