एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) शुक्रवारी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याच बरोबर एबी आता आयपीएलमध्येही सहभागी होणार नाही. मिस्टर 360 डिग्री नावाने प्रसिद्ध असलेल्या एबीच्या निवृत्तीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) अडचणीही वाढल्या आहेत.
डिव्हिलियर्सच्या या निर्णयानंतर आरसीबीचे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. याआधीच विराट कोहलीनेही आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे, याची घोषणा त्याने आयपीएल-14 दरम्यानच केली होती. मात्र, आरसीबी आणि चाहत्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे, की कोहली खेळाडू म्हणून संघात नक्कीच राहणार आहे.
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी आरसीबी व्यवस्थापन कोणत्या खेळाडूंना कायम ठेवते हे पाहणे मनोरंजक असेल. लिलावापूर्वी, प्रत्येक संघ जास्तीत जास्त दोन परदेशी खेळाडूंसह चार खेळाडू राखून ठेऊ शकतो. आरसीबी विराट कोहलीला नक्कीच कायम ठेवेल. याच बरोबर, आरसीबी देवदत्त पडिक्कल आणि युझवेंद्र चहल यांनाही कायम ठेवू शकते. पडिक्कल आणि चहल या दोघांनीही आयपीएलच्या 14व्या हंगामात चमकदार कामगिरी केली. विदेशी खेळाडूंचा विचार करता RCB ग्लेन मॅक्सवेलला कायम ठेवू शकते. या हंगामात मॅक्सवेलने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या.
कोण होणार आरसीबीचा कर्णधार?विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर आरसीबी आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. या पदासाठी डेव्हिड वॉर्नर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. वॉर्नर सध्या सनरायझर्स हैदराबादचा एक भाग आहे, पण तो आयपीएल लिलावात येण्याची शक्यता आहे. वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधारही राहिला आहे. नुकतेच, ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगनेही संकेत दिले आहेत, की आरसीबी लिलावात डेव्हिड वॉर्नरला खरेदी करू शकते.