दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने आयपीएल २०२४ बद्दल एक भाकित वर्तवले आहे. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत असून लवकरच आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. दिग्गजांनी आरसीबीच्या संघाची धुरा सांभाळली पण ट्रॉफीचा दुष्काळ कायम आहे. एबी डिव्हिलियर्स देखील मोठ्या कालावधीपर्यंत आरसीबीच्या संघाचा भाग राहिला आहे. आता त्याने आयपीएल २०२४ ची ट्रॉफी कोण उंचावणार याबाबत भाष्य केले आहे.
आयपीएल २०२४ च्या माध्यमातून आरसीबीच्या तमाम चाहत्यांची इच्छा पूर्ण होईल आणि आरसीबीला विजेतेपद पटकावण्यात यश येईल, असे डिव्हिलियर्सने म्हटले. डिव्हिलियर्स दहा वर्ष आरसीबीच्या फ्रँचायझीचा भाग होता. त्याने २०२१ मध्ये निवृत्तीची घोषणा केली. 'मिस्टर 360' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डिव्हिलियर्सने एका रॅपिड फायर मुलाखतीत RCB आयपीएल २०२४ चा किताब जिंकेल अशी भविष्यवाणी केली. यंदा आरसीबी नक्कीच किताब जिंकेल अशी मला आशा आहे, असे डिव्हिलियर्सने सांगितले.
RCB ला आयपीएल २०२३ मध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. चेन्नई सुपर किंग्जने गेल्या वर्षी ट्रॉफी जिंकली होती. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने १६ हंगामात आठवेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तसेच तीनदा फायनलमध्ये प्रवेश केला पण ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आरसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण, ट्रॉफीपासून वंचित राहावे लागले.
IPL 2024 साठी आरसीबीचा संघ -फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, स्वप्नील सिंग, विजयकुमार विशाक, आकाश दीप, लॉकी फर्ग्युसन, टॉम कुरन, मोहम्मद सिराज, रीस टोपले, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान, अल्झारी जोसेफ, यश दयाल, महिपाल लोमरोर.