'सूर्याच्या फलंदाजीने मी खूप प्रभावित झालो आहे. त्याने या स्तरापर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो सध्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे,' असे दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याने सांगितले. सध्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव आपल्या चौफेर फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे त्याची तुलना एबी डिव्हिलियर्ससोबत केली जात आहे.
सुर्यकुमारची फलंदाजी शैली काहीशी माझ्या शैलीप्रमाणे आहे. तो माझ्यासारखा खेळतो. पण त्याला फक्त कामगिरीत सातत्य ठेवण्यावर भर द्यावा लागेल. पुढील पाच-दहा वर्षे त्याला हेच करावे लागणार आहे, असा सल्ला एबी डिव्हिलियर्सने सुर्यकुमारला दिला आहे. तसेच सुर्यकुमारचे भविष्य खूप चांगले असणार आहे, असंही एबी डिव्हिलियर्स म्हणाला.
एबी डिव्हिलियर्सने लास्ट मॅन स्टँड्सच्या कार्यक्रमामध्ये म्हटले की, 'जेव्हा मी सूर्याला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हापासून आतापर्यंत त्याने खूप प्रगती केली आहे. तो आता त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. सूर्याकडे मोठा अनुभवही आहे आणि साम्य आहे. आता तो सर्वांना आपली क्षमता दाखवून देतोय. जर त्याला फलंदाजीस लवकर पाठवले, तर तो आणखी मनोरंजन करेल आणि येत्या काळात तो नक्कीच भारताच्या सर्वोत्तम खेळाडूपैकी एक बनेल, असं एबी डिव्हिलियर्सने सांगितले.
दरम्यान, सूर्यकुमार यादव सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात देखील भारतीय स्टार फलंदाजाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सूर्याच्या बॅटमधून 225 धावा आल्या आहेत. 3 अर्धशतकी खेळीच्या जोरावर सूर्याने एका वर्षात 1000 धावा करण्याच्या विक्रमाला देखील गवसणी घातली आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात त्याने 25 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
जगात फक्त एकच मिस्टर 360 आहे - सूर्यकुमार यादव
भारत-झिम्बाब्वे सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सूर्यकुमार यादवशी संवाद साधताना त्याच्या शॉट्सची तुलना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सशी केली. यादरम्यान स्कायच्या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली. तो म्हणाला, "जगात एकच 360 डिग्री खेळाडू आहे आणि मी त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करत आहे." एकूणच डिव्हिलियर्स हा एकमेव मिस्टर 360 खेळाडू असल्याचे सूर्याने म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"