ab de villiers ipl । नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. जवळपास सर्वच संघानी आपला पहिला सामना खेळला आहे. नेहमीप्रमाणे यंदा देखील आयपीएलमध्ये चुरशीच्या लढती पार पडत आहेत. कागदावर सर्वात तगडा वाटणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. अशातच आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने आयपीएलच्या सुरूवातीलाच आयपीएल २०२३ चा चॅम्पियन कोण होणार यावर भाष्य केले आहे.
एबी डिव्हिलियर्सने म्हटले...
एबी डिव्हिलियर्सने म्हटले, "आयपीएलमध्ये कोण चॅम्पियन होणार हे सांगणे फार कठीण आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या लिलावादरम्यान मी म्हटले होते की, गुजरात टायटन्समध्ये सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे आणि यावर मी आता देखील ठाम आहे. पण मला मनापासून वाटते की, आरसीबीने यंदाचा किताब जिंकावा. मागील हंगामात आमच्याकडे तगडा संघ होता. त्यामुळे मला आशा आहे की आम्ही देखील आमचा दावा मजबूत करू."
दरम्यान, मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्सने त्याचा सहकारी विराट कोहलीबद्दल म्हटले, "मागील वर्षी कर्णधारपद सोडल्यामुळे विराट कोहलीला खूप आराम मिळाला आहे. तो एक अप्रतिम कर्णधार आहे. आयपीएलमध्ये मोठ्या कालावधीपर्यंत त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. तो कधी-कधी त्याच्या कुटुंबीयांसाठी वेळ काढत असतो. मला वाटते की तो पहिल्यासारखाच असून त्याच्यात फारसा बदल झाला नाही."
RCBची विजयी सलामी
मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. मुंबईला १७१ धावांवर रोखल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अप्रतिम कामगिरी करून विजय साकारला. विराटने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला. तर कर्णधार डू प्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर आरसीबीने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी आणि २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: AB de Villiers says that RCB is expected to be the champion of IPL 2023 but Gujarat Titans can win the title for the second time in a row
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.