बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी एबी डिव्हिलियर्सनं दणक्यात पदार्पण केले. ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करताना एबीनं आज अॅडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. ब्रिस्बन हिट संघानं हा सामना 7 विकेट्स आणि 28 चेंडू राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅण्ड्य्रु सायमंडनं डिव्हिलियर्सला पदार्पणाची कॅप दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अॅडलेड स्ट्रायकर्सचा संपूर्ण संघ 110 धावांवर तंबूत परतला. जेम्स पॅटिन्सननं स्ट्रायकर्सचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानं 33 धावांत 5 विकेट घेतल्या. त्याला बेन कटिंग ( 2/24) आणि जॉश लॅयर ( 2/12) यांनी योग्य साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्स ब्रायंट ( 10) आणि कर्णधार ख्रिस लीन ( 0) हे 11 धावांवर असताना ब्रिस्बन हिटचे सलामीवीर माघारी परतले. त्यानंतर मॅट रेनशॉ आणि एबी यांनी तुफान फटकेबाजी केली. या दोघांनी 77 धावांची भागीदारी केली. एबीनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचताच स्टेडियमवर जल्लोष झाला. त्यानं 32 चेंडूंत 5 चौकारांसह 40 धावा केल्या. रेनशॉ 45 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार मारून 52 धावांवर नाबाद राहिला.