Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यास आता अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ दुबईत दाखल झाले असून काही संघातील परदेशी सदस्य येत्या १-२ दिवसांत बायो बबलमध्ये दाखल होतील. दुबईत सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत आणि यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. सराव सामन्यातील ही फटकेबाजी पाहून प्रत्यक्ष स्पर्धेत नुसता धुरळा उडेल, हे निश्चित आहे. त्यात यंदा आयपीएलची ट्रॉफी उंचावण्याचा पक्का निर्धार केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स ( Ab Devillers) भलत्याच फॉर्मात दिसत आहे. Mr 360 एबीनं त्याच्या भात्यातील सर्व फटके गोलंदाजांवर आजमावताना खणखणीत शतक झळकावले. त्याच्या या भन्नाट खेळीचा व्हिडीओ पाहून प्रतिस्पर्धी आताच सावध झाले असतील.
RCBच्या सराव सामन्यात एबी डिव्हिलियर्सनं ४६ चेंडूंत शतक झळकावले, केएस भारतनं ९५ धावा केल्या. देवदत्त ११ विरुद्ध हर्षल ११ असा हा सराव सामना रंगला आणि त्यात देवदत्तच्या संघानं ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ( Devdutt Padikkal team won by 7 wickets.) हर्षल ११ संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. एबीनं ४६ चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १०४ धावा कुटल्या. त्यानं २२६ च्या स्ट्राईक रेटनं गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याला मोहम्मद अझरुद्दीनची उत्तम साथ मिळाली. अझरुद्दीननं ४३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात देवदत्त ११ संघानं २० षटकांत २१३ धावा करून विजय मिळवला. केएस भारतनं ४७ चेंडूंत ९५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ११ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता, पड्डीकलनं २१ चेंडूंत ३६ धावा केल्या.