नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा फलंदाज इशान किशनने स्फोटक द्विशतक झळकावत भारतावरील व्हाइट वॉशचे संकट टाळले. यासह किशनने भारतीय संघात सलामीवीर म्हणून मजबूत दावा सादर केले. परंतु, यामुळे आता अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही काळापासून धवनची कामगिरी अपेक्षित झालेली नाही. पॉवर प्लेमध्येही धवनकडून संथ फलंदाजी होत असल्याने त्यामुळे धवनला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच सध्याच्या आक्रमक क्रिकेटच्या काळामध्ये शुभमन गिल आणि इशान किशनच्या तुलनेत धवन काहीसा मागे पडला आहे. बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर बीसीसीआय या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी विशेष बैठक घेणार आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या भविष्याबाबतही चर्चा होईल.
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले होते की, ‘अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याची प्रक्रिया पुढील वर्षापासून सुरू होईल.’ बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘नवीन निवड समिती स्थापन झाल्यानंतर शिखर धवनच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पण, याबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या मताकडे दुर्लक्ष होणार नाही.’
संथ सुरुवात धवनची समस्या
सलामीवीर म्हणून खेळताना धवनला वेगाने धावा काढण्यात सातत्याने अपयश येत आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेआधी त्याचा स्ट्राइक रेट १०० हून अधिक होता; पण यंदा त्याचा स्ट्राइक रेट केवळ ७५ इतका आहे. त्यात इशानने भारताला अपेक्षित असलेली आक्रमक सुरुवात करून देताना दमदार द्विशतक ठोकले. त्यामुळे निवड समिती त्याच्याकडे दुर्लक्ष शक्यतो करणार नाही. त्याचवेळी, अनुभवी धवनला संघाबाहेर करणेही निवड समितीसाठी सोपे जाणार नाही. सध्याचा तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा भारतीय आहे.
Web Title: Ab Tera Kya Hoga Gabbar? Shikhar Dhawan's position is threatened by Ishan Kishan's powerful batting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.