Afghanistan vs New Zealand Greater Noida Test Match 2024: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना पाचव्या दिवशीही होऊ शकला नाही. ग्रेटर नोएडा येथे ९ ते १३ सप्टेंबर दरम्यानचा हा सामना रद्द करण्यात आला. खराब हवामान आणि ओले मैदान तसेच स्टेडियमवरील व्यवस्थापनातील उणीवा हे सामना न होण्याचे कारण ठरले. मैदान आणि खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्स (कार्पेट) आणि पंखे देखील भाड्याने आणल्याचा प्रकार या पाच दिवसात पाहायला मिळाला. एकही चेंडूचा खेळ न होता पाच दिवसांचा कसोटी सामना रद्द होण्याची भारतातील ही पहिलीच वेळ ठरली.
९१ वर्षात पहिल्यांदा भारतीय भूमीवर घडला असा प्रकार
सततच्या पावसामुळे अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस खेळणे शक्य झाले नाही, त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी कसोटी सामना रद्द केला. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळला गेलेला ऐतिहासिक एकमेव कसोटी सामना ९१ वर्षातील भारतातील पहिला कसोटी सामना आहे, जो पूर्णपणे रद्द करण्यात आला. भारताने १९३३ मध्ये प्रथम मुंबई (जिमखाना मैदान) येथे कसोटी सामन्याचे आयोजन केले होते. तेव्हापासून भारतात झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच असे घडले, की एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करण्यात आला.
दोनही संघ नाराज
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. पावसाळ्याचे दिवस असूनही स्टेडियममध्ये अपेक्षित सोयी-सुविधा आणि मैदान सुकवण्यासाठी तंत्रज्ञान नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी कडाडून टीका केली. मात्र अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यात भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट मालिका नक्कीच चांगल्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आशिया खंडाबाबत बोलायचे तर डिसेंबर १९९८ मध्ये फैसलाबादमधील एक कसोटी सामना धुक्यामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. हा कसोटी सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात होता. पण ग्रेटर नोएडामध्ये सतत पडणारा पाऊस हे कसोटी सामना न होण्याचे एक कारण होते. दुसरीकडे, खराब ड्रेनेज व्यवस्था आणि संसाधनांचा अभाव यामुळे देखील पेच निर्माण झाला. ग्राउंड स्टाफ देखील मुसळधार पावसापासून संरक्षण करण्यासाठी संपूर्ण मैदान झाकण्यात अपयशी ठरला.
तसेच, नाणेफेक आणि चेंडू टाकल्याशिवाय कसोटी सामना रद्द होण्याची ही २६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. १९९८ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कॅरिसब्रुक, ड्युनेडिन येथे झालेल्या सामन्यादरम्यान क्रिकेट सामन्यात असे घडले होते.
- १८९० पासून ७ वेळा घडला असा प्रकार -
- ऑगस्ट १८९० - ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड
- जुलै १९३८ - ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड
- डिसेंबर १९७० - ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड
- फेब्रुवारी १९८९ - पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड
- मार्च १९९० - वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड
- डिसेंबर १९९८ - पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड
- डिसेंबर १९९८ - भारत विरूद्ध न्यूझीलंड
- सप्टेंबर २०२४ - अफगाणिस्तान विरूद्ध न्यूझीलंड