नवी दिल्ली : पाकिस्तानचे दिग्गज लेग स्पिनर अब्दुल कादिर यांचे हृदयविकाराने वयाच्या ६३व्या वर्षी लाहोर येथे निधन झाले. कादिर यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, चार मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज उमर अकमल कादिर यांचा जावई आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने कादिर यांना श्रद्धांजली वाहतान ट्विट केले की, ‘कादिर यांच्या निधनाने पीसीबी दु:खात आहे. त्यांच्या परिवार आणि मित्रांच्या दु:खात पीसीबी सहभागी आहे.’ १६ वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये कादिर यांनी ६७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटी सामन्यांत २३६, तर एकदिवसीय सामन्यांत १३२ बळी घेतले होते. त्याचबरोबत पाच सामन्यांत त्यांनी पाकिस्तानचे नेतृत्त्वही केले होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर कादिर यांनी समालोचकाची भूमिका पार पाडली. तसेच त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारीही सांभाळली होती. १९८३ आणि १९८७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धांत कादिर यांचा पाकिस्तान संघात समावेश होता.