India vs Bangladesh : बांगलादेश दौऱ्यावर भारताला वन डे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. बुधवारी भारताचा दुसऱ्या वन डे सामन्यात पाच धावांनी पराभव झाला, ज्यामुळे बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दोन सामन्यांपर्यंत भारताचे एकूण चार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होते. यामध्ये मोहम्मद शमी (खांदा), रोहित शर्मा (डावा अंगठा), दीपक चहर (हॅमस्ट्रिंग) आणि कुलदीप सेन ( पाठ) यांचा समावेश आहे. आता रोहित शर्मा कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि अशात बांगलादेशमध्येच धुमाकूळ घालणारा सलामीवीर रोहितची जागा घेऊ शकतो, असा अंदाज आहे.
बोटाला टाके, अनेक इंजेक्शन्स...! पाहा रोहित शर्माची आयुष्यभर लक्षात राहणारी जिगरबाज फटकेबाजी, Video
बांगलादेशच्या डावातील दुसऱ्या षटकात रोहितने दुखापतीमुळे मैदान सोडले होते. डाव्या अंगठ्याच्या स्कॅनसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते... तो ड्रेसिंग रुममध्ये परतला तो बोटावर पट्टी बांधूनच.. त्यामुळे रोहितला फलंदाजीला पाहून भारतीयांना धीर मिळाला. बांगलादेशचे चाहते मात्र तणावात गेले. रोहितने एका हाताने जसे जमेल तसे उत्तुंग फटके मारले अन् अखेरच्या चेंडूपर्यंत बांगलादेशला तव्यावर ठेवले. रोहितने २८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५१ धावांची खेळी केली. पण, अखेरच्या चेंडूवर त्याचा फटका हुकला व भारताला ५ धावांनी हार मानावी लागली.
सामन्यानंतर रोहित मुंबईत उपचारासाठी जाणार असल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले. पण, तो कसोटी मालिकेत खेळणार की नाही, हे त्यांनी सांगितले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार रोहित कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे आणि त्याच्या गैरहजेरीत लोकेश राहुल संघाचे नेतृत्व करेल. भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात मालिका खेळवण्यात येत आहे आणि यात कर्णधार अभिमन्यू ईश्वरन वादळी खेळी करतोय. पहिल्या चार दिवसीय सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अभिमन्यूने कालही १५१ धावांची खेळी करताना संघाला ८ बाद ४७६ धावांचा टप्पा गाठून दिला.
ईश्वरनचे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे १८ वे शतक आहे. ईश्वरननेही मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले आणि १४१ धावांची खेळी खेळली होती. त्यामुळे रोहितच्या जागी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ईश्वरनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुकेश कुमार किंवा उम्रान मलिक यांच्यापैकी एक मोहम्मद शमीला रिप्लेस करेल, तर रवी जडेजाच्या जागी सौरभ कुमारची एन्ट्री झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"