Abhimanyu Easwaran Century : इराणी कप स्पर्धेतील दमदार खेळीसह अभिमन्यू ईश्वरन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेष भारत संघाकडून खेळताना मुंबई विरुद्धच्या लढतीत त्याने कमालीची कामगिरी करुन दाखवली. पहिल्या डावात त्याचं द्विशतक अवघ्या ९ धावांनी हुकले. पण त्याआधी सातत्यपूर्ण खेळीचा नजराणा पेश करत त्याने टीम इंडियातील एन्ट्रीसाठी पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला आहे. त्याची दमदार खेळी बीसीसीआय निवड समितीला त्याच्या नावाचा विचार करण्यास भाग पाडायला लावणारी आहे.
न्यूझीलंड की ऑस्ट्रेलिया; कुणाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळेल संधी?
भारतीय संघ घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही ५ सामन्यांची महत्त्वपूर्ण मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी सर्फराज खानसोबत अभिमन्यू ईश्वनरची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळू शकते. इराणी चषकसाठी सुरु असलेल्या सामन्यात सर्फराज खानच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबईच्या संघाने ५०० हून अधिक धावांचा डोंगर उभारला.
द्विशतक हुकलं, पण जिथ स्टार खेळाडू अपयशी ठरले तिथं सोडली खास छाप
शेष भारत संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यासारखे स्टार खेळाडू अपयशी ठरले असताना अभिमन्यू ईश्वरन तग धरून मैदानात उभा राहिला. त्याने दमदार खेळीस संघाचा डाव सावरत पुन्हा एकदा आपल्यातील क्षमता दाखवून दिली. अभिमन्यु ईश्वरन याने २९२ चेंडूंचा सामना करताना १९१ धावांची दमदार खेळी केली. तो द्विशतक पूर्ण करेल, असे वाटत असताना शम्स मुलानी याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पश्चिम बंगालचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या गड्यानं आपल्या खेळीत १६ चौकारांसह १ उत्तुंग षटकारही मारला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फर्स्ट क्लास कामगिरी
अभिमन्यू ईश्वरन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहेत. ९७ सामन्यात ४८.४४ च्या सरासरीनं त्यान ७ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात २५ शतकांसह २९ अर्धशतकांचा समावेश आहे. तो याआधी भारतीय संघासोबत दिसला आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न देता तो ड्रॉप झाला. पण आता पुन्हा त्याची एन्ट्री होण्याचे संकेत मिळत आहेत. ही एन्ट्री घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून होणार की, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नामी संधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल. ऋतुराज गायकवाडच्या जागी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लागू शकतो नंबर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी भारताच्या डावाला सुरुवात करेल, हे जवळपास फिक्स आहे. पण या दौऱ्यासाठी भारतीय संघात तीन सलामीवीरांना संधी मिळू शकते. आतापर्यंत त्यात ऋतुराज गायकवाडचं नाव आघाडीवर होते. पण आता पुणेकराऐवजी अभिमन्यू ईश्वरनचा नंबर लागू शकतो. प्रथम श्रेणीतील आकडेवारीच्या बाबतीत अभिमन्यू हा ऋतुराजवर भारी पडतो.
ऋतुराज गायकवाडची कामगिरी
ऋतुराज गायकवाडनं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३२ सामने खेळले आहेत. त्याच्या खात्यात २२७३ धावा जमा आहेत. यात ६ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. आकडे अभिमन्यू ईश्वरनच्या बाजूनं असले तरी बीसीसीआय कुणाला संधी देणार त्यावरच सर्वकाही अवलंबून असेल. जर अभिमन्यूला संधी मिळाली तर शेष भारत विरुद्ध तो ज्या ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीत खेळला त्याला तो मात देईल.