IPL 2024 मधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा स्टार ओपनर अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) याने गुरुग्राम येथील स्थानिक सामन्यात २६ चेंडूंत १४ षटकार व ४ चौकार खेचून शतकी खेळी केली. आयपीएल २०२४ मध्ये अभिषेकने एकूण ४२ षटकार खेचले, जे सर्वाधिक होते. त्याने संपूर्ण स्पर्धेत २०४ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना ३५० पर्यंत धावा कुटल्या होत्या. तोच फॉर्म त्याने स्थानिक सामन्यात पाहायला मिळाला.
मारिओ क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्यात अभिषेक पंटर्स ११ संघाकडून खेळला. पंटर्सचा कर्णधार समीरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मारिओ संघा २० षटकांत ७ बाद २४९ धावा चोपल्या. सलामीवीर कुणाल सिंगने २१ चेंडूंत ६० धावा केल्या, तर नदीम खान ३२ चेंडूंत ७४ धावांवर नाबाद राहिला. अभिषेकच्या एका षटकात १३ धावा कुटल्या गेल्या.
प्रत्युत्तरात पंटर्सने २६ धावांत २ विकेट्स गमावल्या आणि अभिषेक फलंदाजीला आला. त्याने २६ चेंडूंत १०३ धावांची वादळी खेळी केली. त्यात ४ चौकार व १४ षटकारांचा समावेश होता. त्याला लक्ष ( २९ चेंडूंत नाबाद ४४ धावा) व पुनील मेहरा ( २१ चेंडूंत ५२ धावा) यांची चांगली साथ मिळाली आणि पंटर्सने ४ विकेट्स व ११ चेंडू राखून हा सामना जिंकला.