IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: आयपीएलमधील आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत असलेल्या सामन्यात पाहुण्या मुंबईची चांगलीच धुलाई झाली. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन या त्रिकुटाने हार्दिकसेनेची चांगलीच धुलाई केली. विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करून हैदराबादच्या संघाने इतिहास रचला. मुंबईसमोर विजयासाठी तब्बल २७८ धावांचे आव्हान आहे. यजमान हैदराबादने निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या.
मंयक अग्रवाल (११) स्वस्तात बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी स्फोटक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. हेडने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ६२ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावा कुटल्या. एडन मार्करम आणि हेनरिक क्लासेन यांनी देखील हात साफ केले.
एडन मार्करमने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ८० धावा कुटल्या आणि ऐतिहासिक धावसंख्या उभारली.
मुंबईकडून सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. क्वेना मफाकाने ४ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने ४ षटकांत ४६ धावा देत १ बळी घेतला. तर जसप्रीत बुमराहने पहिले दोन षटक चांगले टाकले आणि ४ षटकांत ३६ धावा दिल्या मात्र त्यालाही बळी घेता आला नाही. गेराल्ड कोएत्झीने ४ षटकांत ५८ धावा देऊन १ बळी घेतला, तर पियुष चावलाच्या २ षटकांत यजमानांनी ३४ धावा खेचल्या. शम्स मुलाणीच्या २ षटकांत हैदराबादने ३३ धावा काढल्या.
SRH च्या फलंदाजांचा रूद्रावतार
- हेनरिक क्लासेन (३४ चेंडूत नाबाद ८० धावा)
- अभिषेक शर्मा (२३ चेंडूत ६३ धावा)
- ट्रॅव्हिस हेड (२४ चेंडूत ६२ धावा)
- एडन मार्करम (२८ चेंडूत नाबाद ४२ धावा)
तत्पुर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. यजमान संघात ट्रॅव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांची एन्ट्री झाली आहे. तर मुंबईच्या संघात ल्यूक वुडच्या जागी Kwena Maphaka ला संधी मिळाली आहे.
आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट.
आजच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.
Web Title: Abhishek Sharma, Travis Head and Henrik Klaassen played a superb knock for Sunrisers Hyderabad as Hardik Pandya's Mumbai Indians set a target of 278 for victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.