मुंबई : युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ हा भारतासाठी टी-२०त मॅचविनर बनू शकतो. आगामी टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून त्याला अधिक संधी देण्याची गरज असल्याचे मत माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे. इंग्लंडविरुद्ध आगामी पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी २३ वर्षांच्या पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. पंतने कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली. मालिका विजयात त्याचे योगदान निर्णायक ठरले. अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत पंतने शतक ठोकले होते.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण म्हणाला,‘आम्ही पंतला दिल्ली कॅपिटल्सकडून दडपणात खेळून सामना जिंकताना पाहिले आहे. डावखुरा फलंदाज या नात्याने तो पर्याय सुचवितो. तो स्थिरावल्यास प्रतिस्पर्धी कर्णधार अडचणीत येतो. त्याचा आगामी मालिकेत समावेश करणे योग्य निर्णय आहे. एक दोन सामने खेळवून त्याच्या कामगिरीचे आकलन करू नका. विश्वचषक लक्षात ठेवून त्याला खेळवा. एकदा त्याला संघात स्थिरावण्याची खात्री लाभली तर तो एकट्याच्या बळावर सामना जिंकून देऊ शकतो.’ भारताकडून १३४ कसोटी सामने खेळलेल्या लक्ष्मणचे मत असे की, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबतही पंत फिनिशरची भूमिका वठवू शकेल. मागच्या दीड वर्षांपासून आम्ही हार्दिक आणि जडेजा यांच्यावर फारच विसंबून आहोत. यात पंतची भर पडल्यास आमच्याकडे पर्याय उपलब्ध होऊ शकतील. पंत हा पहिल्या चेंडूपासून आक्रमक होत चेंडूवर तुटून पडू शकतो. कसोटी सामन्यात त्याने बरेच काही आत्मसात केले असून, परिपक्व फलंदाजांसारखा तो मॅचविनर म्हणून पुढे येत आहे. याशिवाय प्रथमच संघात स्थान मिळालेला सूर्यकुमार यादव हादेखील भारतीय संघासाठी मोठी कामगिरी करू शकतो, असा मला विश्वास आहे. सूर्यकुमार हा भारतीय युवा खेळडूंसाठी रोल मॉडेल असून, राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचा हकदार होता, असेही लक्ष्मणने म्हटले आहे.