दुबई : प्रतिभावान युवा फलंदाज शुभमान गिल याच्या खेळावर माजी कर्णधार सुनील गावसकर फारच प्रभावित झाले आहेत. हा खेळाडू आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करीत आहेत.विशेष शैैलीत शुभमानचे कौतुक करताना गावसकर म्हणाले, ‘तुम्ही कोणत्याही भारतीय खेळाडूला एक प्रश्न विचारा. भारताचा पुढचा स्टार कोण? असा प्रश्न केल्यास उत्तर मिळेल शुभमान गिल. २१ वर्षांचा हा खेळाडू खेळात पुरेसा आत्मविश्वास राखतो. यामुळे त्याच्या खऱ्या क्षमतेचा परिचय घडेल. केकेआरसाठी सातत्यपूर्ण खेळ करण्यास त्याचा हा गुण लाभदायी ठरणार आहे. तू प्रत्येक सामना खेळशील, असे कुणी त्याला सांगणार असेल तर तो पूर्ण क्षमतेसह संघासाठी लाभदायी ठरू शकतो.’रोमहर्षक सामन्यांमुळे ‘दादा’ खूशआयपीएलमध्ये यंदा सामन्यांचा रोमहर्षक निकाल लागत असल्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली फारच आनंदी आहेत. ते स्वत: सामन्यांचा आनंद लुटत आहेत. यापुढील सामने आणखी उत्कंठापूर्ण होतील, तसेच महिला टी-२० चॅलेज स्पर्धादेखील अटीतटीची होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महिलांचे सामने यंदा पुरुष प्ले आॅफ लढतींदरम्यान खेळविण्यात येणार आहेत.
पंचगिरीचा स्तर उंचावण्यासाठीतंत्राचा अधिक वापर व्हावा - वाडियानवी दिल्ली : आयपीएलमध्ये पंचगिरीचा स्तर उंचावण्यासाठी तंत्राचा अधिकाधिक वापर करण्याची मागणी किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी केली आहे.दिल्लीविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभूत होण्याआधी पंजाबला पंचाच्या निर्णयाचा फटका बसला. पंच नितीन मेनन यांनी दिलेला ‘शॉर्ट रन’ कॉल वादग्रस्त ठरला. ती धाव पंजाबला मिळायला हवी होती, असे अनेकांचे मत आहे. वाडिया म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या या युगात आम्ही क्रिकेट पारदर्शी आणि निष्पक्ष करू शकलो नाही, हे वेदनादायी आहे. ईपीएल आणि एनबीएसारखे तंत्र आमच्याकडेही वापरात यायला हवे. ’ ‘पंचांच्या निर्णयाचा स्तर आणखी चांगला व्हावा, अशी बीसीसीआयला मी विनंती करणार आहे. जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या लीगचा स्तर उंचावण्यासाठी तंत्राचा सर्वाधिक वापर करण्यात यावा. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बीसीसीआय नियमात बदल करेल,’ असा विश्वास वाडिया यांनी व्यक्त केला.