नवी दिल्ली : क्रीडा स्पर्धेच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करीत असलेल्या जवळजवळ ६० टक्के चाहत्यांचे मत आयपीएलचे (इंडियन प्रीमिअर लीग) आयोजन यंदा होऊ शकते तर १३ टक्के चाहत्यांच्या मते आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये व्हायला हवे. एका सर्व्हेमध्ये हा खुलासा झाला आहे.
कोविड-१९ महामारीमुळे जगभरात सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा रद्द झालेल्या आहेत. त्यात आॅलिम्पिकही वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. भारतातील क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा आयपीएल २९ मार्चपासून प्रारंभ होणार होती, पण सुरुवातीला ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आणि त्यानंतर आयोजकांनी स्वास्थ्य संकटाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
‘माईटी ११’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेमध्ये १० हजार लोकांना विचारणा करण्यात आली. त्यात अनेकांनी स्पर्धा सुरू होण्याची आशा व्यक्त केली, पण स्टेडियम प्रदीर्घ काळ रिकामे राहणार असल्याचे म्हटले आहे. आयपीएलबाबत यात म्हटले आहे की, ‘६० टक्के लोकांच्या मते आयपीएलचे आयोजन कदाचित अन्य उपलब्ध विंडोदरम्यान केल्या जाऊ शकते. यावरून चाहते या स्पर्धेच्या आयोजनाची आतुरतेने प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते.’
सर्वेमध्ये सहभागी झालेल्या जवळजवळ ४० टक्के लोकांच्या मते यंदा या स्पर्धेचे आयोजन होणार नाही. १३ टक्के लोकांच्या मते जून-जुलैमध्ये उपलब्ध वेळेत रिकाम्या स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन व्हायला हवे. ६३ टक्के चाहते स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत तर तीन-चार महिन्यात स्पर्धा झाली तर २० टक्के चाहत्यांना कुठलीच अडचण नाही.वर्षाच्या अखेरपर्यंत क्रीडा स्पर्धा सुरू होतीलया सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ८३ टक्के लोकांच्या मते २०२० च्या शेवटी क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकतील तर ४० टक्के लोकांच्या मते २०२१ पूर्वी क्रीडा स्पर्धा बघायला जाताना सहज वाटणार नसल्याचे म्हटले आहे. या महामारीमुळे लोकांना प्रभावित केले आहे.