Join us  

वर्ल्ड कपनंतर टीम इंडियानं जिंकल्या 11 मालिका, जाणून घ्या कोणात्या संघांना नमवलं!

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीतही टीम इंडियाचं नाणं खणखणीत वाजत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 3:26 PM

Open in App

भारतीय संघानं बुधवारी न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात सुपर ओव्हरच्या थरारात टीम इंडियानं बाजी मारली. मोहम्मद शमीनं सामन्याला कलाटणी देणारं षटकं टाकलं आणि रोहितनं त्यावर विजयी कळस चढवला. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा हा 11 वा मालिका विजय आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीतही टीम इंडियाचं नाणं खणखणीत वाजत आहे. 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कॅप्टन कूल धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. संघ संकटात असताना कर्णधार विराट कोहलीला अनेकदा धोनीचा सल्ला घेताना पाहिले गेले आहे. पण, आता धोनीच्या अनुपस्थितीत टीम इंडियानं मालिका विजयाचा सपाटा लावला आहे. फक्त एका मालिकेत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. वर्ल्ड कपनंतर टीम इंडियानं वेस्ट इंडिज दौरा केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आदी संघांचा टीम इंडियानं सामना केला. यात एकाही मालिकेत भारताला हार मानावी लागली नाही. 10 जुलैनंतर भारतानं ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी अशा एकूण 12 मालिका खेळल्या आणि त्यापैकी 11 मालिका जिंकल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटली.

वर्ल्ड कपनंतर भारतानं ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला अनुक्रमे 3-0, 2-0 आणि 2-0 असे पराभूत केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी पत्करली. पण, कसोटी मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय साजरा केला. त्यापाठोपाठ बांगलादेनं भारत दौरा केला आणि तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारतानं 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला होता. पण, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटच्या नेतृत्वाखाली 2-0 असा दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत भारतानं अनुक्रमे 2-1 व 2-1 असा विजय साजरा केला.

नववर्षातही टीम इंडियाचा हा विजयी धडाका कायम राखला. टीम इंडियानं 2020मधील पहिल्याच मालिकेत श्रीलंकेला ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 असा आणि ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत 2-1 असे पराभूत केले. 2020मधील पहिल्याच परदेश दौऱ्यावरही टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत इतिहास रचला. न्यूझीलंडमध्ये टीम इंडियानं प्रथमच ट्वेंटी-20 मालिका जिंकली.

 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीश्रीलंकाबांगलादेशआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकावेस्ट इंडिज