ऑस्ट्रेलियन संघाने २४ वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा केला आणि कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीला पोषक असलेल्या पिचमुळे सामने अनिर्णित राहिले. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३९१ तर पाकिस्तानने २६८ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३ बाद २२७ धावांवर घोषित करून पाकिस्तानला ३५१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव सामन्याच्या पाचव्या दिवशी २३५ धावांवर आटोपला. या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाक संघ व्यवस्थापन आणि क्रिकेट बोर्डाचे अक्षरश: वाभाडे काढले.
शोएब अख्तर यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, "ही एकदम निराशाजनक मालिका होती. एक मूर्खपणा (नॉनसेन्स) घडल्याचं दिसला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाची मानसिकता मालिका ड्रॉ करायची होती असं वाटतंय. म्हणूनच ना त्यांनी जिंकावं ना आम्ही जिंकावं, फक्त ही संपावी आणि अनिर्णित राहावी असाच त्यांचा विचार दिसला. पण बघा, जेव्हा तुमच्यात हिंमत नसते आणि तुम्ही जेव्हा फक्त पळून जाण्याचा विचार करता, त्याचे परिणाम असे पराभवातच होतात. ते २४ वर्षांनंतर इथे आले होते आणि त्यांनी तुमच्याकडून चांगली खेळपट्टी तयार करण्याची अपेक्षा केली होती. पण तुम्ही तसे केले नाही. तुम्ही त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केलात. शेवटी उलट घडलं आणि तुम्ही हारलात. हा चुकीचा दृष्टीकोन आणि चुकीची मानसिकता आहे. आपण अशा लोकांना आणले पाहिजे जे योग्य निर्णय घेतील. पण दुर्दैवाने, पाकिस्तानमध्ये तसं घडताना दिसत नाहीये", असं अख्तर म्हणाला.
"पण ऑस्ट्रेलियन लोकांना सलाम. मी त्यांच्यासाठी खरोखर आनंदी आहे. हे त्यांचं घरचं मैदान नाही, यापैकी एकही खेळाडू यापूर्वी पाकिस्तानात खेळला नव्हता; ते इथे आले आणि धाडसी पद्धतीने क्रिकेट खेळले. इथल्या परिस्थितीत चेंडू कसा वळतो, किती स्विंग होतो हे गोलंदाजांना कळत नव्हते पण मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोघांनीही येथील खेळपट्टीचा बरोबर अंदाज घेतला. नॅथन लियॉनसारखा फिरकीपटू, ज्याने अद्याप पाकिस्तानचा दौरा केलेला नव्हता, त्यानेही पाच बळी घेतले. हे सारं कौतुकास्पद आहे", असंही शोएब अख्तरने दिलखुसापणे मान्य केलं.