Asia Cup 2023 स्पर्धेतील आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार्या सर्व सामन्यांना पावसाचा धोका असताना केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan Super 4 ) सुपर 4 सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्याबद्दल भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद ( Venkatesh Prasad) याने आशियाई क्रिकेट परिषदेवर ( ACC) जोरदार टीका केली. एसीसीने शुक्रवारी ही घोषणा केली. "पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्यादरम्यान प्रतिकूल हवामानामुळे खेळ थांबला, तर सामना ११ सप्टेंबर २०२३ रोजी जिथे थांबला तिथून सुरू होईल," असे एका निवेदनात म्हटले आहे.
बुमराह परतला, KL Rahul फिट झाला; पाकविरुद्ध Playing XI मध्ये होणार 'हे' बदलभारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी कोलंबोमध्ये खेळणार आहेत, परंतु श्रीलंकेच्या राजधानीत आठवड्याच्या शेवटी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलाय. वृत्त प्रसिद्ध होताच प्रसादने आयोजकांवर हल्ला चढवला आणि या निर्णयाला "एकदम निर्लज्ज" "मस्करी" आणि "अनैतिक" म्हटले. ACCच्या अध्यक्षपदावर जय शाह आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तिकिटांवरूनही प्रसादने बीसीसीआय व आयसीसी यांना फटकारले आहे. "राखीव दिवसाचा निर्णय जर खरा असेल तर हा निर्लज्जपणा आहे. आयोजकांनी चेष्टा चालवली आहे आणि इतर दोन संघांसाठी नियम वेगळे असल्याने ही स्पर्धा घेणे अनैतिक आहे," असे प्रसादने ट्विट केले.
माजी वेगवान गोलंदाज एवढ्यावरच थांबला नाही. तो पुढे म्हणाला की,''भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दोन्ही दिवशी पावसाने खेळ खराब केला आणि दुर्भावनापूर्ण योजना यशस्वी झाली नाही तर ते योग्य होईल. न्यायाच्या नावाखाली, पहिल्या दिवशी सामना रद्द केला तरच न्याय्य ठरेल, दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडू दे आणि ही योजना यशस्वी होऊ नये."
श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनी सावध विधाने केली. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड म्हणाले, "जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा थोडे आश्चर्य वाटले, परंतु त्याच वेळी आम्ही स्पर्धेचे आयोजक नाही त्यामुळे आम्ही याबद्दल फार काही करू शकत नाही." बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा म्हणाले, "होय, हे आदर्श नाही, आम्हाला अतिरिक्त दिवस असला असता तर आवडले असते. त्याशिवाय माझ्याकडे जास्त भाष्य नाही कारण त्यांनी (तांत्रिक समिती) निर्णय घेतला आहे."