Join us  

अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही

भारतात मागच्या वर्षी पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने अप्रतिम निकालांची नोंद करून सर्वांना प्रभावीत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 7:54 PM

Open in App

भारतात मागच्या वर्षी पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने अप्रतिम निकालांची नोंद करून सर्वांना प्रभावीत केले. ऑस्ट्रेलियाला त्यांनी जवळपास पराभवाचा धक्का दिलाच होता, परंतु ग्लेन मॅक्सवेलच्या द्विशतकाने अफगाणिस्तानला हार मानावी लागली. याशिवाय त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका व नेदरलँड्स यांना पराभवाचा धक्का दिला. पण, त्यांना सहाव्या स्थानासह स्पर्धेतून निरोप घ्यावा लागला. या कामगिरीसह त्यांनी २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची पात्रता निश्चित केली. अफगाणिस्ताच्या या स्पर्धेतील कामगिरीच्या यशाचा वाटा भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा ( Ajay Jadeja) यालाही जातो. 

भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा या स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाचा  मेंटॉर ( मार्गदर्शक) म्हणून काम करत होता. अजयकडे असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनुभवाचा आणि भारतीय खेळपट्ट्यांची असलेली माहिती याचा अफगाणिस्तानला फायदा झाला. पण, या भूमिकेसाठी अजय जडेजाने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एकही रुपया घेतला नसल्याची बातमी समोर येत आहे. ACB च्या सीईओंनी सांगितले की, अजय जडेजाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघासोबत केलेल्या कामासाठी एकही पैसा घेण्यास नकार दिला. तो म्हणाला 'तुम्ही चांगले खेळा, हेच माझे मानधन आणि बक्षीस असेल, जे मला तुमच्याकडून हवे आहे.'

अजयने १९९२ ते २००० या कालावधीत १५ कसोटी सामन्यांत ५७६ धावा केल्या आहेत आणि ९६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. शिवाय त्याने १९६ वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यात ३७.४७च्या सरासरीने ५३५९ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व ३० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्याकडे १११ प्रथम श्रेणी आणि २९१ लिस्ट ए क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याच्या नावावर एकूण ८०००+ धावा, ३१ शतकं व ८८ अर्धशतकं आहेत. 

टॅग्स :अफगाणिस्तानवन डे वर्ल्ड कप