मुंबई : अफगाणिस्तानच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी अ गटात पाकिस्तान आणि कुवैत यांना पराभवाची चव चाखवून उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला आहे. पाकिस्तानला सलग चार सामन्यांत त्यांनी पराभवाची चव चाखवली आहे. याच अफगाणिस्तान संघातील एका खेळाडूनं भारतीय संघाविरुद्ध विश्वविक्रमाला गवसणी घातली, परंतु त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 124 धावांत तंबूत परतला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 24 षटकांत 2 बाद 84 धावा केल्या होत्या. तेव्हा अफगाणिस्तानने नूर अहमद लाकनवाल याला गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्याने पहिल्या 4 षटकांत केवळ 18 धावा दिल्या. दुसऱ्या स्पेलमध्ये त्यानं भारतीय संघाला हादरे दिले. त्याने कर्णधार सलील अरोरा आणि ध्रुव चंद जुरेल यांना एकाच षटकांत माघारी पाठवले. त्यानंतर त्याने अथर्व अंकोलेकर आणि तिलक वर्मा ठाकूर यांना बाद केले. त्यानं 10 षटकांत 1 निर्धाव षटक टाकत 30 धावांत 4 विकेट्स घेतला. या कामगिरीसह त्यानं स्पर्धेत सर्वाधिक 8 विकेट्स घेण्याची बरोबरी केली. त्याच्या या स्पेलनं भारत 7 बाद 106 असा अडचणीत सापडला, परंतु करण लाल व पुर्नांक त्यागी यांनी आठव्या विकेटसाठी 22 धावा जोडताना भारताचा विजय पक्का केला.
चार विकेट्स घेत नूरने विश्वविक्रमाला गवसणी घातली. युवा वन डे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 14 वर्ष व 249 दिवसांचा असताना हा पराक्रम केला. बांगलादेशच्या निहादुझ्झामनने 14 वर्ष व 327 दिवसांचा असताना पाच विकेट्स ( वि. वेस्ट इंडिज, 2013) घेण्याचा पराक्रम केला होता. सर्व युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार विकेट्स घेणारा नूर हा युवा गोलंदाज ठरला आहे. त्यानं पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर असलेला विक्रम मोडला.
मलिकनं 14 वर्ष व 311 दिवसांचा असताना 1996 मध्ये इंग्लंडविरुद्ध युवा कसोटी सामन्यात 38 चेंडूंत 4 विकेट्स घेतल्या होत्या. नूरने हा विक्रम मोडला. महिलांमध्ये हा विक्रम पाकिस्तानच्या साजीदा शाह ( 13 वर्ष व 68 दिवस) च्या नावावर आहे. तिनं 2001मध्ये नेदरलँड्सविरुद्ध वन डे सामन्यात 22 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.