IND U19 vs UAE U 19 Match India won by 10 wkts And Reach Semi Final : शारजहाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय अंडर १९ संघानं १० विकेट्स राखून विजय मिळवत १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना युएईच्या संघाचा डाव ४४ षटकात १३७ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर आयुष म्हात्रे ६७ (५१) आणि वैभव सूर्यवंशी ७६(४६) अर्धशतके झळकावत संघाला १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विजय मिळवून दिला. भारतीय संघ आता उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सामना खेळताना दिसेल.
गोलंदाजी वेळी युधजित गुहानं केली हवा
पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या युएई संघाची सुरुवातच खराब झाली. युधजित गुहा याने पाचव्या षटकात युएई संघाच्या धावफलकावर १४ धावा असताना आर्यन सक्सेनाच्या रुपात भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिलाय. अक्षत राय २६ (५२), डिसुझा १७ (२७), रायन खान ३५(४८) आणि युधीश सुरी १६(४६) यांच्याशिवाय युएईच्या ताफ्यातील कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी संघाला निर्धारित ५० षटकेही खेळता आली नाहीत. ४४ षटकात भारतीय संघाने १३७ धावांत त्यांचा खेळ खल्लास केला. भारताकडून युधजित गुहा याने सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. त्याच्याशिवाय चेतन शर्मा आणि हार्दिक राज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. केपी कार्थिकेया आणि आयुष म्हात्रे यांच्या खात्यातही एक-एक विकेट जमा झाली.
सलामी जोडीनं १७ व्या षटकातच संपवली मॅच
युएईच्या संघाने सेट केलेल्या १३८ धावांचे टार्गेट पार करताना भारतीय सलामीवीर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यंवशी यांनी सुरुवातीपासून आक्रमक अंदाज दाखवला. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यंवशी यांच्यात कोण आधी अर्धशतक झळकवणार याची जणून शर्यतच लागली होती. संघातल्या संघात सुरु असलेल्या या स्पर्धेत वैभवनं बाजी मारली. IPL मध्ये कोट्यवधींची बोली लागलेल्या या खेळाडूनं अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४६ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला आयुष म्हात्रेनं ५१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा केल्या. जपान विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने युएई विरुद्ध स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. सलामी जोडीनं १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मॅच संपवली.
Web Title: ACC U19 Asia Cup, 2024 Ayush Mhatre And Vaibhav Suryavanshi Fifty India U19 won by 10 wkts Against United Arab Emirates U19 And Reach Semi Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.