आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील एका दिग्गज माजी क्रिकेटर्सचे निधन झाले आहे. या क्रिकेटपटूने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्धचा खेळला होता. त्यानंतर, ते वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सिलेक्टर कमिटीचे चेअरमनही बनले होते. सन १९८० च्या शतकात वेस्ट इंडिज संघात स्थान मिळवून त्यांनी प्रभावशाली क्रिकेट खेळलं होतं.
दिग्गज ऑफ स्पीनर क्लाईड बट्स यांचं अपघाती निधन झालं आहे. गुयानाचे माजी कर्णधार आणि वेस्ट इंडिजचे ऑफ स्पीनर गोलंदाज क्लाईड बट्स यांचा शुक्रवारी कार अपघातात मृत्यू झाला. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने अधिकृतपणे त्यांच्या निधनाची माहिती दिली. गुयानाचे माजी कर्णधार आणि वेस्ट इंडिज ऑफ स्पीनर गोलंदाज तथा वेस्ट इंडिज सिलेक्टर कमिटीचे माजी चेअरमन क्लाईड बट्स यांचं निधन झालं. त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबाप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ट्विट वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने केले आहे.
क्लाईड यांची क्रिकेट कारकिर्द
सन १९८० च्या दशकातील प्रभावशाली वेस्ट इंडिज संघात स्थान मिळवण्यात क्लाईड यशस्वी ठरले होते. आपल्या गोलंदाजीने त्यांनी प्रभाव निर्माण केला होता. त्यांनी १९८५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, सन १९८८ साली भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळले होते. त्यांनी वेस्ट इंडिजसाठी एकूण ७ कसोटी सामने खेळले असून १० विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, त्यांनी १०८ धावाही केल्या आहेत. फर्स्ट क्लासच्या ८७ सामन्यांत त्यांनी ३४८ विकेट्स घेतल्या होत्या. तर, लिस्ट ए च्या ३२ सामन्यात ३२ गडी बाद केल्याचं ट्रॅक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
जो सोलोमन यांचेही निधन
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार जो सोलोमन यांचंही निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जो सोलोमन यांचं आंतरराष्ट्रीय करिअर ७ वर्षांचं राहिलं. या दरम्यान, वेस्ट इंडिज संघासाठी त्यांनी २७ कसोटी सामने खेळले. त्यामध्ये, त्यांनी १ शतक आणि ९ अर्धशतक केले होते. सोलोमन यांनी एकूण १३२६ धावा केल्या आहेत.