मुंबई : रविवारी झालेल्या थरारक अंतिम सामन्यात रोहित शर्माचे नतृत्व ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. या शानदार विजयासह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान रोहितने मिळविला. कर्णधार म्हणून त्याने आयपीएलची सर्वाधिक चार जेतेपद पटकावली आणि खेळाडू म्हणून त्याचे हे पाचवे जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सने अखेरपर्यंत झुंजार वृत्ती ठेवल्याने हे यश मिळविले, शिवाय अंक शास्त्राचीही त्यांना साथ होतीच. अंकशास्त्रानुसार यंदाचे जेतेपद मुंबई इंडियन्सनेच होते, जाणून घेऊ या कसे.
रोहितने आयपीएल अंतिम सामन्यात एकदाही पराभव पत्करलेला नाही आणि असा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. रोहितने डेक्कन चार्जर्सकडून २००९ मध्ये आयपीएलचा चषक पहिल्यांदा उंचावला होता. त्यानंतर, मुंबई इंडियन्सकडून त्याने (२०१३, २०१५, २०१७ व २०१९) चारवेळा जेतेपद पटकावले. जेतेपदांच्या सालावर लक्ष दिल्यास लक्षात येईल की, एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईने बाजी मारली आहे. त्यामुळे यंदाही त्यांचेच नाणे खणखणीत वाजेल, यात कुणालाही शंका नव्हती. रोहितने या जेतेपदासह महेंद्रसिंग धोनीशी आणखी एका बाबतीत बरोबरी केली. धोनीने अविवाहीत, पती आणि वडील अशा तिन्ही भूमिकेत असताना आयपीएल चषक उंचावला, रोहितनेही हीच कामगिरी करून दाखविली.
मुंबई इंडियन्से २०१७ मध्ये हैदराबाद येथेच रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला अवघ्या एका धावेने हार मानण्यास भाग पाडले होते आणि २०१९ मध्ये त्यांनी चेन्नईवरही एका धावेने विजय मिळविला. यापूर्वी मुंबईने जिंकलेल्या तीनही जेतेपदाच्या वेळी ‘आॅरेंज कॅप’ पटकावणारा खेळाडू हा आॅस्ट्रेलियाचाच राहिला आहे. पण २०१५ आणि २०१७ मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि मुंबई इंडियन्स हे समीकरण जुळले आहे. वॉर्नरने २०१५ मध्ये १४ सामन्यांत ७ अर्धशतकांसह ५६२ धावा, तर २०१७ मध्ये १४ सामन्यांत ४ अर्धशतके व एका शतकासह ६४१ धावा करत आॅरेंज कॅप पटकावली होती. यंदाही आॅरेंज कॅप वॉर्नरलाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याने यंदा १२ सामन्यांत ८ अर्धशतके व एका शतकासह ६९२ धावा चोपल्या. त्यामुळे २०१३ व २०१५ प्रमाणे वॉर्नर यंदाही मुंबई इंडियन्ससाठी ‘लकी बॉय’ ठरला.