Join us  

विराट कोहलीची BCCIकडे तक्रार करणारा सीनियर खेळाडू कोण, ते समोर आलं; नाव जाणून बसेल धक्का

विराटचे नेतृत्व जाण्यामागे संघातील एक वरिष्ठ खेळाडूच कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 4:07 PM

Open in App

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडताना पायाहला मिळत आहेत. विराट कोहली ( Virat Kohli) यानं वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली, त्यापाठोपाठ त्यानं RCBचेही कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. त्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपनंतर कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला. शास्त्रींच्या जागी बीसीसीआयनं अनिल कुंबळे यांना आणण्याच्या हालचाली सुरू करून विराटला कोंडीत पकडण्याचा डाव आखला आहे. विराटचे नेतृत्व जाण्यामागे संघातील एक वरिष्ठ खेळाडूच कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती. सीनियर खेळाडूनं बीसीसीआयकडे विराटची तक्रार केली आणि त्यानंतर बीसीसीआय कर्णधारावर नाराज झाली. हा सीनियर खेळाडू कोण, हे आता समोर आलं आहे.

सीनियर खेळाडूनं काय केली होती तक्रार?मैदानातील सामन्यानंतर विराट कोहली संघातील सदस्यांना सहज उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे खेळाडूंसोबतच्या संवादाचा अभाव निर्माण झाला होता. खासकरुन न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारतीय संघातील वातावरण काही आलबेल नव्हतं. पराभवानंतर कोहलीच्या एकूणच स्वभावात संवादाचा अभाव निर्माण झाला होता. याची संघातील एका सीनियर खेळाडूनंही गंभीर दखल घेतली होती. सीनियर खेळाडूनं याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशीही चर्चा केली होती.  काही खेळाडू कोहलीच्या स्वभावावर नाखुश होते. कोहलीनं स्वत:वरील नियंत्रण गमावत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं.   

तो सीनियर खेळाडू कोण?IANSनं दिलेल्या वृत्तानुसार रविचंद्रन अश्विन यानं विराटची बीसीसीआयकडे तक्रार केली होती आणि त्यामुळेच विराटनं वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराटनं हा निर्णय जाहीर करताना वर्कलोडचं कारण सांगितलं होतं आणि वन डे व कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचेही स्पष्ट केले होते.  IANSच्या वृत्तानुसार आर अश्विननं बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली. विराट चांगली वागणून देत नसल्याचा आरोप त्यानं केला. त्यामुळेच की काय विराटनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनला चारही सामन्यांत बाकावर बसवून ठेवले.  

विराट कोहलीला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात हवा होता युझवेंद्र चहल, पण...ज्या आर अश्विनला इंग्लंड दौऱ्यावर विराटनं बाकावर बसवून ठेवले त्याला थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान देऊन बीसीसीआयनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. चार वर्षांनंतर आर अश्विनचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन होत आहे. आता हे दोन्ही महत्त्वाचे निर्णय विराटला न विचारता घेण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे. IANS नं दिलेल्या वृत्तातून ही धक्कादायक बातमी समोर आली असून विराट व बीसीसीआय यांच्यातील वाद टोकाला गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात विराटला युझवेंद्र चहल हवा होता, परंतु निवड समितीनं आर अश्विनची निवड केली.

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयरोहित शर्माआर अश्विन
Open in App