वेळेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने ठाण्यातील नेहरूनगर परिसरात असलेल्या मित्रोन लॉन्जवर कारवाई करण्यात आली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला हा लॉन्ज सकाळी ६ पर्यंत सुरू होता. नियमभंग केल्याने या लॉन्जला सिल ठोकण्यात आलं आहे. दरम्यान, या लॉन्जमध्ये भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा सुद्धा सकाळपर्यंत पार्टी करत होता, अशी माहिती समोर येत आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या ट्विटनंतर या लॉन्जवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, सुमारे सहा बाऊन्सर्सनी सकाळी सहाच्या सुमारास काही कारणावरून ग्राहकांसोबत गैरवर्तन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या लॉन्जला सकाळपर्यंत सुरू ठेवण्यासाठी विशेष परवानगी दिली आहे का. इतर ऑर्केस्ट्रा बार, फॅमिली बार रात्री १.३० वाजता बंद होतात. मग या लॉन्जला विशेष परवानगी का दिली गेली आहे, असा प्रश्न मी विचारला होता.
राज्याचा उत्पादन शुल्क विभाग कायदे आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अशा लॉन्जवर काही कारवाई करणार आहे का? ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी काही कारवाई करणार आहेत का? असा प्रश्न मी विचारला. या ट्विटनंतर या लॉन्जचे मालक अभिजित पाटील आणि अभिजित कोरगावकर आणि सहा बाउन्सर्सविरोधात विविध कलमांखाली वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे इन्स्पेक्टर आर. सी. बिराजदार यांनी सांगितले की, नियमांचं उल्लंघन केल्याने हा लॉन्ज सिल करण्यात आला आहे. तसेच सकाळपर्यंत मद्याची विक्री केल्यानेही लॉन्जविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.